जम्मू : जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानने ड्रोनच्या सहाय्याने पिशव्यांमधून अमली पदार्थ टाकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली. सुरक्षा दलांनी ताब्यात घेतलेल्या दोन पिशव्यांमध्ये पाच किलो हेरॉईन होते. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत २५ कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले. या कारवाईने सुरक्षा दलांनी भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्याचा पाकिस्तानचा बेत उधळून लावला.
सोमवारी सकाळी सहा वाजता जम्मू विभागातील आर एस पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानी ड्रोन भारतीय हद्दीत घिरट्या घालताना दिसले. त्यानंतर सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ जतिंदर चौकी भागात संयुक्तपणे शोधमोहीम राबवली, त्यामध्ये हे अमली पदार्थ सापडले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे भारतीय हद्दीत आणखी अमली पदार्थ टाकण्याचा पाकिस्तानस्थित तस्करांचा बेत सुरक्षा दलांनी उधळून लावला, अशी माहिती ‘बीएसएफ’च्या प्रवक्त्यांनी दिली. त्यांनी सांगितले की, “बिडीपूर गावाजवळ राबवलेल्या शोधमोहिमेत अमली पदार्थ असलेली पिवळ्या रंगाची दोन पाकिटे सापडली. त्यामध्ये १० लहान पाकिटे गुंडाळलेली होती. त्यांचे वजन साधारण ५.३ किलो इतके होते.” या प्रकरणी संबंधित कायद्याखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
