भारताचा शेजारी देश असणाऱ्या पाकिस्तानमध्ये महागाई दिवसोंदिवस वाढत आहे. महागाईमुळे त्रासलेल्या जनतेला धोरणात्मक निर्णय घेऊन दिलासा देण्याआवजी येथील नेते जनतेला विचित्र सल्ले देत आहेत. पाकिस्तानमधील सत्ताधारी इम्रान खान सरकारमधील पाकव्यप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानसंदर्भातील मंत्री अली अमीन गंडापूर यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेला संबोधित करताना असाच एक विचित्र सल्ला दिलाय.

आपण साखर आणि पोळ्या कमी प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत असं गंडापूर यांनी म्हटलं आहे. “मी चहामध्ये साखरेचे शंभर दाणे टाकतो. थोडी साखर कमी टाकल्याने काय तो काय कमी गोड लागणार आहे का, शंभरपैकी नऊ दाणे कमी टाकले तर काय मोठा फरक पडणारय? आपल्या देशासाठी, समाजासाठी आपण एवढं सुद्धा बलिदान देऊ शकत नाही का?” असा प्रश्न गंडापूर यांनी विचारलाय.

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमधील सांख्यिक ब्यूरोने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यामध्ये उपभोगता मूल्यांक नऊ टक्के नोंदवण्यात आला आहे. महागाई वाढल्याने लोकांना दैनंदिन जीवनामधील गोष्टी खरेदी करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागत आहेत.

“जर ९ टक्के महागाई आहे आणि मी पीठासाठी १०० दाणे वापरतो तर मी माझ्या देशाठी ९ दाणे कमी खाऊ शकत नाही का? लोकांनी पोटांना चिमटे काढून युद्ध लढली आहेत. सुपरपॉवर असणाऱ्या देशाला त्यांनी नमवलं आहे. आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला मुलांना कसा पाकिस्तान द्यायचा आहे. जन्माला आल्या आल्या कोणतंही मुलं कर्जदार नसावं असा आपला प्रयत्न हवा,” असं गंडापूर म्हणालेत. सोशल मीडियावर त्यांचं भाषण व्हायरल झालंय. अशाप्रकारे महागाई कमी करण्यासाठी कमी खाण्याचा, कमी गोष्टी सेवन करण्याचा सल्ला देणारे गंडापूर हे पाहिलेच नेते नाहीत. यापूर्वीही अनेक नेत्यांनी पाकिस्तानमध्ये असा सल्ला दिलाय.

करांसंदर्भात सरकारी नवीन धोरणं, जागतिक स्तरावर वाढलेल्या वस्तूंच्या किंमती आणि पाकिस्तानी रुपयाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेलं अवमूल्यन या तीन कारणांमुळे पाकिस्तानमध्ये महागाई वाढल्याचं सांगितलं जातं आहे.