पाकिस्तानच्या राष्ट्रीय निवडणुकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. नेहमीप्रमाणे याही निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला. मात्र आता या निवडणुकीची मतमोजणी संपली असून माजी पंतप्रधान इम्रान खान यांची लोकप्रियता कमी झालेली नाही, हे या निकालावरून स्पष्ट झाले. इम्रान खान हे तुरुंगात असले तरी त्यांचे समर्थन असलेल्या एकूण १०१ अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला आहे. तर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पीएमल-एन पक्षाने एकूण ७५ जागांवर बाजी मारली आहे.

इम्रान खान सरस, नवाझ शरीफ यांना फटका

इम्रान खान संध्या तुरुंगात आहेत. त्यांना ही निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आली होती. तसेच त्यांच्या पीटीआय पक्षाचे चिन्हही तात्पुरते गोठवण्यात आले. त्यामुळे इम्रान खान यांच्या पक्षातील नेत्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागली. तरीदेखील या निवडणुकीत इम्रान खान यांचे समर्थन असलेले अपक्ष उमेदवारच अनेक जागांवर सरस ठरले आहेत. पाकिस्तानी निवडणूक आयोगानुसार इम्रान खान यांचा पाठिंबा असलेल्या एकूण १०१ अपक्ष उमेदवारांचा विजय झाला आहे. तर नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाने ७५ जागांवर विजय मिळवला आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीने ५४ जागांवर बाजी मारली आहे.

लष्कराचे नवाझ शरीफ यांना समर्थन

पाकिस्तानच्या राष्ट्रीय निवडणुकीत तेथील लष्कराचा हस्तक्षेप असतो. त्यामुळे लष्कराने ज्या नेत्याला पाठिंबा दिला, तोच नेता या निवडणुकीत विजयी होतो, असे म्हटले जाते. यावेळी लष्कराने आपली ताकद नवाझ शरीफ यांच्या पाठीमागे उभी केली होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत नवाझ शरीफ हेच बाजी मारतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रत्यक्ष निकाल मात्र काहीसा वेगळा लागला आहे. येथे इम्रान खान यांचा पाठिंबा लाभेलेले अपक्ष उमेदवार अनेक जागांवरून विजयी झाले आहेत. तर नवाझ शरीफ यांचा पक्ष विजयी उमेदवारांच्या तुलनेत थेट दुसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

सत्तास्थापनेसाठी हालचाली वाढल्या

या निकालानंतर पाकिस्तानचे राष्ट्रपती डॉ. आरीफ अलवी यांनी समाजमाध्यमांवर तेथील जनतेचे अभिनंदन केले. या निवडणुकीत तेथील महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. याचाही उल्लेख करत अलवी यांनी पाकिस्तानी महिलांचे अभिनंदन केले. तर नवाझ शरीफ यांच्या पक्षातील नेते आझम नाझीर तारा यांनी निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला. या गैरप्रकाराच्या विरोधात आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत, असे आझम यांनी स्पष्ट केले. तर दुसरीकडे इम्रान खान यांचा पाठिंबा असलेल्या अनेक अपक्ष उमेदवारांनी नवाझ शरीफ, नवाझ शरीफ यांची कन्या मरिअम शरीफ, माजी संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या विजयावर आक्षेप घेतला आहे.

पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी आंदोलन

निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाल्यामुळे आता पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पक्षाचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. या समर्थकांकडून आंदोलन केले जात आहे. परिणामी पाकिस्तान पोलीस, सुरक्षा रक्षकांकडून आंदोलकांना ताब्यात घेतले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकार स्थापनेसाठी शरीफ यांचा प्रयत्न

दरम्यान, निकाल स्पष्ट झाल्यामुळे आता येथे सत्तास्थापनेला वेग आला आहे. नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाकडून वेगवेगळ्या पक्षाला युतीसाठी पाचारण केले जात आहे. नुकतेच या पक्षाने मुत्ताहिदा कोमी मुव्हमेंट पाकिस्तान (एमक्यूएम-पी) या पक्षाशी आमची चर्चा चालू आहे, असे सांगितले. तर एमक्यूएम-पी पक्षाचे प्रवक्ते सिद्दिकी यांनी मात्र सरकार स्थापनेबाबत आमची पीएमएल-एन या पक्षाशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात पाकिस्तानमध्ये कोण पंतप्रधान होणार? कोणाचे सरकार येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.