नवी दिल्ली : ‘‘सातत्याने विश्वासघाताला सामोरे गेल्यानंतर पाकिस्तानबरोबर संबंध सुधारण्यासाठी पहिले पाऊल उचलण्याची भारताची अजिबात इच्छा नाही. ही जबाबदारी आता पाकिस्तानची असून, त्यांनी त्यांच्या भूमीवरील दहशतवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त करून प्रामाणिकपणा दाखवावा,’ असे उद्गार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी काढले.
एका पुस्तकाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १९५० मधील लियाकत अली खान यांच्याबरोबर करार करण्यापासून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची १९९९ मधील लाहोर बस यात्रा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ मध्ये दिलेली लाहोर भेट या सर्वांतून पाकिस्तानने विश्वासघात केल्याचेच समोर आले आहे.
आता दोन्ही देशांतील संबंध सुधारावेत, यासाठी पाकिस्तानने पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यांच्या भूमीवरील दहशतवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त करून त्यांनी प्रामाणिकपणा दाखवावा.’ चर्चेमध्ये माजी परराष्ट्र सचिव कंवल सिबल, भारताचे पाकिस्तानमधील राजदूत म्हणून काम केलेले टी. सी. ए. राघवन, निवृत्त लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर, अभ्यासक अमिताभ मट्टू हेदेखील चर्चेमध्ये सहभागी होते.