Pakistan On Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत डोनाल्ड ट्रम्प यांनी असिम मुनीर यांच्याबरोबर भोजन देखील केलं. या भेट दरम्यान त्यांच्यात महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचं बोललं जातं. खरं तर एका देशाचे लष्करप्रमुख आणि एका देशाचे राष्ट्राध्यक्ष यांची भेट झाल्यामुळे या भेटीत काय चर्चा झाली? या भेटीमागे काय कारण असेल? असे सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

असिम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतल्यानंतर लगेचच असिम मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव २०२६ च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवलं आहे. विशेष म्हणजे नोबेल शांतता पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव सुचवण्यामागचं कारण देखील पाकिस्तानने सांगितलं आहे. भारत-पाकिस्तानमधील संघर्ष रोखण्याचं श्रेय पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांना देत त्या कारणास्तव ट्रम्प यांच्या नावाची शिफारस केल्याचं पाकिस्तानने सांगितलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानने एका औपचारिक निवेदनात डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक केलं आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीसाठी महत्त्वपूर्ण हस्तक्षेप केल्याचं सांगत संकटादरम्यान त्यांच्या निर्णायक राजनैतिक सहभाग आणि निर्णायक नेतृत्वाचं कौतुक केलं. तसेच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी एका महत्त्वाच्या क्षणी पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांशी संवाद साधून उत्तम धोरणात्मक दूरदृष्टी दाखवली आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे शस्त्रसंधी झाली, ज्यामुळे एक विनाशकारी संघर्ष टळला, असं पाकिस्तानने एका औपचारिक निवेदनात म्हटलं आहे.

भारत-पाकिस्तानमध्ये तणावाबाबत पाकिस्तानने असा दावा केला की ट्रम्प यांच्यामुळे परिस्थिती तणाव कमी झाला आणि शांतता प्रस्थापित झाली. त्यामुळे हा हस्तक्षेप राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या खऱ्या शांतता प्रस्थापित करणाऱ्या भूमिकेचा आणि संवादाद्वारे संघर्ष सोडवण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुरावा असल्याचं पाकिस्तानने निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान, जागतिक पातळीवर सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारासाठी पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव सुचवल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आताच पाकिस्तानशी जवळीक का?

मनीकंट्रोलमधील लेखानुसार, भारत-पाक या दोन अण्वस्त्रधारी देशांमधील संघर्ष थांबवल्याचा पोकळ दावा ट्रम्प यांनी केल्यानंतर असीम मुनीर यांनी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी पाठिंबा दिला आहे. ट्रम्प यांची जागतिक पातळीवरील प्रतिमा चांगली करण्यासाठी याचा लाभ होऊ शकतो. तर दुसरं कारण म्हणजे, इराण-इस्रायल युद्धात तेहरानच्या (इराणची राजधानी) जवळ असलेला पाकिस्तान महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. ट्रम्प माध्यमांशी बोलताना म्हणाले, “त्यांचे (पाकिस्तानी नेतृत्व) इराणशी चांगले संबंध आहेत. सध्या जे काही चाललं आहे, ते पाकिस्तानला पटलेलं नसून ते माझ्याशी सहमत आहेत.”