Shehbaz Sharif official youtube channel blocked in india pahalgam terror attack Update : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. यादरम्यान भारताने पाकिस्तान विरोधात भूमिका घेतली असून याअंतर्गत सिंधू जल करार रद्द करत सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. इतकेच नाही तर अनेक पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मिडिया अकाउंट्सवर देखील भारतात बंदी घालण्यात आली आहे. यातच आता भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे युट्यूब चॅनल देखील भारतात बंद केले आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी माहिरा खान, हानिया आमिर आणि साजल अली अशा अनेक प्रसिद्ध पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घातली आहे. हे कलाकार भारतात देखील खूप प्रसिद्ध आहेत आणि यांची मोठी फॅन फॉलोईंग भारतात आहे. पण या कालाकारांचे सोशल मीडिया अकाउंट सध्या भारतात पाहात येत नाहीत.

शहबाज शरीफ यांच्या चॅनलबरोबरच प्रसिद्ध पाकिस्तानी ड्रामा चॅनल जसे की हम टीव्ही आणि एआरवाय डिजीटल यांच्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. हे चॅनल देखील आता भारतात युट्यूबवर पाहाता येणार नाहीत.

अलीकडेच केंद्र सरकारने १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेल ब्लॉक केले आहेत, ज्यांचे एकत्रितपणे ६३ मिलीयनहून अधिक सब्सक्रायबर्स होते. यामध्ये डॉन, जिओ न्यूज, बोल न्यूज आणि समा टीव्ही सारख्या मीडिया आउटलेटसह पत्रकार अस्मा शिराजी आणि ‘द पाकिस्तान एक्सपिरीयन्स’ सारख्या लोकप्रिय चॅनल्सचा समावेश आहे. सरकारी सूत्रांनी या चॅनल्सवर कारवाई करताना प्रक्षोभक, चुकीची माहिती देणारे किंवा देशाच्या सौहार्दाला इजा करणारा कंटेटचे कारण दिले आहे.

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी २६ जणांचा मृत्यू झाला होता, यानंतर या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध असल्याने भारताने पाकिस्तानविरोधी आक्रमक भूमिका घेतली आहे, ज्यामध्ये १९६० चा सिंधू जल करार रद्द करण्यात आला आहे आणि पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढले जात आहे.