scorecardresearch

अफगाणिस्तानसाठी पाकिस्तानचे पंतप्रधान आले धावून; जागतिक संघटनांना घातलं साकडं!

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारसाठी आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जागतिक संघटनांना साकडं घातलं आहे.

Imran Khan

ऑगस्ट महिन्यात १५ तारखेला तालिबान्यांनी काबूलवर ताबा मिळवला आणि अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबान्यांचा अंमल प्रस्थापित झाला. या घटनेमुळे समस्त जग चिंतातूर झालं आणि जागतिक पटलावरून अफगाणिस्तानवर अनेक प्रकारचे निर्बंध लादण्यात आले. तालिबान्यांनी मानवी हक्क, महिलांचे अधिकार याविषयी ठोस आणि जागतिक पातळीवर मान्य होणारी भूमिका घ्यावी, अशी अट घालण्यात आली. या पार्श्वभूमीवर तालिबानकडून सातत्याने जगभरातल्या देशांकडून अफगाणिस्तानमधल्या तालिबानी सरकारला स्वीकृति मिळावी, यासाठी प्रयत्न केला जात असताना आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अफगाणिस्तानसाठी धावून आले आहेत. तालिबान सरकारसाठी इम्रान खान यांनीच जागतिक संघटनांना साकडं घातलं आहे.

अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर अनेक जागतिक संघटनांनी अफगाणिस्तानची त्यांच्याकडे असलेली संपत्ती आणि मालमत्ता गोठवून ठेवली आहे. जोपर्यंत अफगाणिस्तानमधील नव्या सरकारला जागतिक पातळीवर मान्यता मिळत नाही, तोपर्यंत ही संपत्ती तालिबानी सरकारला मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानमधील आर्थित परिस्थिती बिघडण्याची भिती पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे.

जपानच्या राजदूतांकडे मांडली भूमिका

इम्रान खान यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी जपानचे राजदूत कुनिनोरी मातसुदा यांच्याशी बोलताना अफगाणिस्तानविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “जागतिक संघटनांनी अफगाणिस्तानची गोठवलेली संपत्ती आणि मालमत्ता मुक्त करावी. अफगाणिस्तानमध्ये येऊ घातलेल्या आर्थिक संकटाला टाळण्यासाठी तालिबानी प्रशासनासोबत चर्चा करावी आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करावी”, अशी मागणी इम्रान खान यांनी केली आहे.

शांत अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानला रस

दरम्यान, यावेळी बोलताना इम्रान खान यांनी शांत आणि स्थिर अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानला रस असल्याची भूमिका मांडली. अफगाणिस्तानमध्ये सर्वसमावेशक राजकीय व्यवस्था अस्तित्वात यावी, अशी देखील अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-10-2021 at 20:21 IST
ताज्या बातम्या