Donald Trump Meet Shehbaz Sharif : अमेरिका आणि भारतामधील संबंध टॅरिफच्या मुद्द्यावरून काही दिवसांपासून ताणले गेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वेगवेगळ्या कारणांवरून सातत्याने भारतावर टीका करत आहेत. मात्र, ट्रम्प यांच्या टिकेला भारतही जशास तसं प्रत्युत्तर देत आहे. असं असताना दुसरीकडे अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये जवळीक वाढली असल्याचं चित्र दिसून येत आहे. याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती.

एवढंच नाही तर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शाहबाज शरीफ हे डोनाल्ड ट्रम्प यांची लवकरच भेट घेणार असल्याची चर्चा समोर आली आहे. या भेटी दरम्यान पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे देखील उपस्थित असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागच्या काही दिवसांचा विचार केला तर पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यातील बैठका वाढल्या आहेत. त्यामुळे अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये नेमकं काय शिजतंय? या भेटीमागे काय दडलंय? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

वृत्तानुसार, २५ सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेदरम्यान शाहबाज शरीफ हे ट्रम्प यांची भेट घेण्याची शक्यता आहे.या भेटीवेळी असीम मुनीरही उपस्थितीत असण्याची शक्यता वृत्तात व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, ही भेट नेमकं कोणत्या अजेंड्यावर असणार? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. या संदर्भातील वृत्त जिओ न्यूजच्या हवाल्याने इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तानमधील बिघडत चाललेल्या संबंधाबाबत काही मुद्दे या बैठकीत उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेलेले आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धडा शिकवला. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्ताने गेल्या काही महिन्यांत अमेरिकेशी संबंध सुधारण्यासाठी ठोस प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. तसेच अमेरिका आणि पाकिस्तानमध्ये व्यापारी संबंधाबाबतही काही करार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता शाहबाज शरीफ आणि ट्रम्प यांच्या या होणाऱ्या भेटीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.