Khawaja Asif : पाकिस्तानातील अनेक भागात पुराचा कहर सुरू आहे. हजारो लोकांना या पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. दरम्यान, एकीकडे पूर आलेला असताना दुसरीकडे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी जनतेला दिलेल्या एका सल्ल्याची मोठी चर्चा रंगली आहे.

‘लोकांनी पुराचं पाणी पिंपांमध्ये साठवून ठेवावं’, असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना ख्वाजा आसिफ यांनी हे विधान केलं आहे. तसेच यावेळी त्यांनी असंही म्हटलं की, “जास्तीचे पाणी हे आशीर्वादाचे स्वरूप मानले पाहिजे.” दरम्यान, या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

ख्वाजा आसिफ यांनी काय म्हटलं?

“आता हे पाणी लोकांनी साठवून ठेवलं पाहिजं. जे लोक रस्ता अडवून बसले आहेत त्यांनी ते त्यांच्या घरी नेऊन हे सर्व पाणी तिथे साठवावं. त्यांनी ते कुठेतरी कुठल्यातरी कंटेनरमध्ये ठेवावं. हे पाणी साठवून ते आशीर्वादाचं रूप मानायला हवं. यासाठी मोठी धरणं देखील बांधली पाहिजेत. पण आता ती पूर्ण होण्यास ८-१० वर्षे लागू शकतात”, असं ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं आहे.

माहितीनुसार, पाकिस्तानच्या पंजाब प्रांत इतिहासातील सर्वात मोठ्या पुराचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून लोकांना मदत करण्याच्याऐवजी पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अशा प्रकारचं विधान केल्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. एका वृत्तानुसार, पुरामुळे आणि पावसामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात ३३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच २,२०० गावांना पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. तसेच ७,००,००० पेक्षा जास्त रहिवाशांना स्थलांतरीत करावं लागलं आहे.