Italy’s Giorgia Meloni Expression: इस्रायल-हमास यांच्यात दोन वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष थांबविण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी पुढाकार घेतला. सोमवारी इजिप्तच्या शर्म अल-शेख येथे गाझा शांतता शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती. या शिखर परिषदेत गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी अमेरिकेसह युरोप, आशिया खंडातील २० देशांचे नेते उपस्थित होते. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी यावेळी आपल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांती तोंडभरून स्तुती केली. त्यांच्या भाषणादरम्यान मागेच उभ्या असलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे हावभाव कॅमेऱ्यात कैद झाले. यासंबंधीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

ट्रम्प यांना नोबेल मिळावे – पाकिस्तान

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी म्हटले, “डोनाल्ड ट्रम्प शांतता प्रस्थापित करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहेत. त्यांनी भारत-पाकिस्तान संघर्ष थांबविण्यासाठीही चांगले योगदान दिले. त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा होता. आम्ही पुन्हा एकदा त्यांना नोबेल मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवू.”

शाहबाज शरीफ भाषण करत असताना त्यांच्या मागे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर उभे होते. ज्यावेळी शाहबाज शरीफ यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पुन्हा एकदा नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले, तेव्हा मेलोनी यांनी तोंडावर हात ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले. शाहबाज शरीफ ट्रम्प यांचे तोंडभरून कौतुक करत असताना मेलोनी अस्वस्थ दिसत होत्या.

मे २०२५ मध्ये झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सशस्त्र संघर्ष सुरू झाला होता. या संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला असला तरी भारताने हा दावा वेळोवेळी फेटाळून लावला आहे. पाकिस्ताननेही अमेरिकेने मध्यस्थी केल्याचे म्हटले आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले, भारत-पाकिस्तान संघर्ष थांबविण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी अतिशय उत्तम मध्यस्थी केले. हे युद्ध थांबविल्याबद्दल आम्ही त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळावा, असा प्रस्ताव पाठवला होता आणि आज पुन्हा आम्ही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून त्यांचे नाव सुचवत आहोत. कारण आम्हाला खरंच वाटते की, ते या पुरस्कारासाठी योग्य दावेदार आहेत. त्यांनी केवळ दक्षिण आशियात शांतता राबवली असे नाही. तर त्यांनी लाखो लोकांचे जीवन वाचवले आहे. आज त्यानी शर्म अल-शेख येथे गाझा शांतता करार करत लाखो लोकांचे जीव वाचवले आहेत.

शाहबाज शरीफ यांच्या कौतुकाने ट्रम्प काहीसे भारावून गेले. ते जेव्हा भाषणासाठी आले, तेव्हा आनंदात म्हणाले, “मला याची बिलकुल कल्पना नव्हती. चला आता घरी जाऊया, माझ्याकडे बोलण्यासाठी अधिक काही. खूपच चांगले भाषण त्यांनी केले. सर्वाना धन्यवाद.”