Indian Army Slodiers: ऑपेरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याने काल रात्री भारतातील काही ठिकाणांवर ३०० ते ४०० ड्रोनच्या माध्यमातून अयशस्वी हल्ले केले होते. यामध्ये भारताने पाकिस्तानचे हे सर्व हल्ले परतावून लावले आहेत. मात्र, पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात काही भारतीय जवान शहीद झाले आहे. याबाबत सरकारने आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.

विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पाकिस्तानी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानमधील चार हवाई संरक्षण स्थळांवर सशस्त्र ड्रोन डागण्यात आले होते. त्यापैकी एक ड्रोन एडी रडार नष्ट करण्यात यशस्वी झाला. पाकिस्तानने हेवी-कॅलिबर तोफखाना आणि सशस्त्र ड्रोन वापरून नियंत्रण रेषेवर तोफगोळ्यांचा मारा केला. याचबरोबर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानी सैन्याचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच या कारवाईत भारतीय लष्कराचे काही जवान शहीद झाले आहेत. तर, काही जवान जखमी झाले आहेत.”

या पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले, “पाकिस्तानने आपले कृत्य मान्य करण्याऐवजी, भारतीय सशस्त्र दल अमृतसरसारख्या त्यांच्याच शहरांना लक्ष्य करत आहेत आणि पाकिस्तानवर दोषारोप ढकलण्याचा प्रयत्न करत आहे असे हास्यास्पद आणि अपमानजनक दावे केले आहेत. भारताने नानकाना साहिब गुरुद्वारावर ड्रोन हल्ला केला अशी चुकीची माहिती पाकिस्तानने पसरवली आहे, जी खोटी आहे. जातीय वाद निर्माण करण्याच्या उद्देशाने पाकिस्तान परिस्थितीला सांप्रदायिक रंग देण्याचा प्रयत्न करत आहे.”

ते पुढे म्हणाले की, “काल रात्री पाकिस्तानने केलेल्या या चिथावणीखोर आणि आक्रमक कृतींमध्ये भारतीय शहरे आणि नागरी पायाभूत सुविधा तसेच लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्यात आले. याला भारतीय सशस्त्र दलांनी अतिशय संतुलित प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने या हल्ल्यांची जबाबदारी नाकारणे हे त्यांच्या ढोंगीपणाचे उदाहरण आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच पत्रकार परिषदेत बोलताना, कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, “८-९ मे च्या मध्यंतरी रात्री, पाकिस्तानी सैन्याने लष्करी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने संपूर्ण पश्चिम सीमेवर अनेक वेळा भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केले. पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवरही मोठ्या कॅलिबर शस्त्रांचा गोळीबार केला. आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवरील ३६ ठिकाणी घुसखोरीसाठी ३००-४०० ड्रोनचा वापर करण्यात आला. भारताने यापैकी अनेक ड्रोन पाडले. दुसरीकडे, पाकिस्तानने नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून केला.”