Pakistan Trying To Match India’s Drone And Counter-Drone System: ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात, देशाच्या सीमावर्ती भागात लष्कर ‘कोल्ड स्टार्ट’ नावाचा संयुक्त सराव आयोजित करणार आहे. या सरावाच्या माध्यमातून सध्याच्या ड्रोन आणि काउंटर-ड्रोन प्रणालींची चाचणी घेतली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूर नंतरचा हा सर्वात मोठा सराव असणार आहे. याचा उद्देश सध्याच्या हवाई संरक्षण क्षमतेचा प्रभाव आणि त्यामध्ये असलेल्या त्रुटींचे मूल्यांकन करणे आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दिल्ली येथे पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या “काउंटर यूएव्ही आणि एअर डिफेन्स सिस्टीम्स – द फ्युचर ऑफ मॉडर्न वॉरफेअर” या विषयावरील परिषदेत बोलताना, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एअर मार्शल आशुतोष दीक्षित, चीफ ऑफ इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ यांनी पाकिस्तानचा उल्लेख करत, ते सुद्धा भारतासारखे होण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले.

एअर मार्शल आशुतोष दिक्षित म्हणाले की, “तेही (पाकिस्तान) भारतासारखे बनण्यासाठी प्रयत्न करत आहेत, म्हणून आपण नेहमीच एक पाऊल पुढे राहिले पाहिजे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपल्या काउंटर-ड्रोन आणि जीपीएस जॅमिंग सिस्टीमने प्रभावी कामगिरी केली, ज्यामुळे शत्रूच्या ड्रोनमुळे कोणतेही नुकसान झाले नाही. परंतु यादरम्यान शत्रूला आपल्या क्षमता लक्षात आल्या आहेत. पुढच्या वेळी, आपल्याला एक पाऊल पुढे राहावे लागेल.”

या कार्यक्रमात इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ (ऑपरेशन्स) चे उपप्रमुख राकेश सिन्हा देखील उपस्थित होते. ते म्हणाले की, “ड्रोन आणि संरक्षणात्मक उपाययोजनांमधून युद्धाचे भविष्य ठरेल. यामुळे काउंटर-ड्रोन सिस्टीममध्ये गुंतवणूक करणाऱ्या देशांना याचा धोरणात्मक फायदा होईल. काउंटर-ड्रोन तंत्रज्ञान केवळ सध्याच्याच नव्हे तर भविष्यातील ड्रोन क्षमतांचा लाभ घेण्यासाठी सतत विकसित झाले पाहिजे.”

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर राबवले. या ऑपरेशनद्वारे भारतीय लष्कराने पाकिस्तान व पाकिस्तान व्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांचे नऊ तळ उद्ध्वस्त केले होते.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारताच्या सीमावर्ती भागांत हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले होते. जे लष्कराने परतावून लावले होते. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये तब्बल चार दिवस लष्करी संघर्ष चालला होता.

Live Updates