नवी दिल्ली : “पाकिस्तानच्या दडपशाहीच्या धोरणाचा परिणाम म्हणून पाकिस्तानी सैन्य तेथील निरपराध नागरिकांवर अत्याचार करत आहे,” अशी टीका परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी केली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या निदर्शनांबद्दल भारताने पहिल्यांदाच अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भाग पाकिस्तानने जबरदस्तीने आणि बेकायदा बळकावलेला प्रदेश आहे, हेदेखील परारष्ट्र मंत्रालयाने अधोरेखित केले.

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सोमवारपासून सुरू असलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागून तेथे आतापर्यंत किमान १० जणांचा मृत्यू झाला आहे. निर्वासितांसाठी राखीव जागा रद्द कराव्यात यासह एकूण ३२ मागण्यांसाठी ‘जम्मू काश्मीर संयुक्त अवामी कृती समिती’कडून ही निदर्शने केली जात आहेत. त्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, “पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील अनेक ठिकाणी निदर्शने सुरू असल्याचे वृत्त आम्ही पाहिले आहे. निरपराध नागरिकांवर पाकिस्तानी सैन्य कशा प्रकारे अत्याचार करत आहे, हेही आम्ही पाहिले आहे. आमची खात्री आहे की, हा पाकिस्तानच्या दडपशाही दृष्टिकोनाचा नैसर्गिक परिणाम आहे. मानवाधिकारांच्या गंभीर उल्लंघनाबद्दल पाकिस्तानला जबाबदार ठरवले पाहिजे.”

दरम्यान, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांची समिती स्थापन केली आहे.