एखाद्या भीषण आपत्तीत किंवा अपघातातून काही जण बचावतात. त्यांचे जिवंत राहणे फक्त आश्चर्यच नसते, तर त्याकडे चमत्कार म्हणून पाहिले जाते. अशी एखादी घटना घडल्यानंतर देव तारी, त्याला कोण मारी हे शब्द आठवतात. हेच काल पाकिस्तानात भीषण वि्मान दुर्घटनेमध्ये दिसून आले. विमानात एकूण ९९ प्रवासी होते. त्यात ९७ जणांचा मृत्यू झाला. पण दोघेजण बचावले.

पाकिस्तानात कराचीमध्ये जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ शुक्रवारी दुपारी भीषण विमान अपघात घडला. ९९ प्रवासी असलेले पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआयए) पीके-८३०३ हे विमान दाट लोकवस्तीच्या भागात कोसळले. या भीषण विमान दुर्घटनेत ९७ प्रवाशांचा मृत्यू झाला पण दोन जण चमत्कारिकरित्या बचावले आहेत.

आणखी वाचा- “सगळीकडे नुसता धूर आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या, मी कसाबसा…” ‘त्याने’ सांगितलं विमानात काय घडलं

पाकिस्तानील बँक ऑफ पंजाबचे प्रमुख झफर मसूद आणि झुबेर नावाचा एक व्यक्ती या भीषण अपघातातून बचावला आहे. सुदैवाने बँक ऑफ पंजाबचे सीईओ झफर मसूद यांना फक्त फ्रॅक्चर झाले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

लाहोरहून उड्डाण केलेले पीके-८३०३ हे विमान कराचीला उतरण्यासाठी अवघ्या एका मिनिटाचा कालावधी राहिलेला असतानाच मलीर येथील मॉडेल कॉलनीजवळच्या जिना गार्डन परिसरात कोसळले.

आणखी वाचा- CCTV Video: लँडिंगच्या काही सेकंद आधीच विमान इमारतींवर कोसळले

यामुळे परिसरातील घरांचे नुकसान होऊन तेथील अनेक जण जखमी झाले आहेत. दुर्घटनाग्रस्त विमान रडारवरून अदृश्य होण्यापूर्वी वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण मनोऱ्याशी संपर्क साधून विमान उतरविण्यासाठी असलेल्या गिअरमध्ये समस्या असल्याची माहिती दिली होती. पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी आणि पंतप्रधान इम्रान खान यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. इम्रान खान यांनी या घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले आहेत.