Panchayat Web Series Real Phulera Village Poor Condition : टीव्हीएफची (The Viral Fever) सुपरहिट वेब सिरीज ‘पंचायत’चा चौथा सीझन अमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला असून या सिरीजला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. या सिरीजमध्ये उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्ह्यातील फखौली या छोट्या शहरानजिक असलेल्या फुलेरा या लहानशा गावातील लोकांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. तिथला समाज, स्थानिक राजकारण, तिथल्या गमतीजमती या सिरीजमध्ये पाहायला मिळतात.

ही सिरीज उत्तर प्रदेशमध्ये चित्रीत केलेली नसून मध्य प्रदेशमधील एका गावात चित्रित करण्यात आली आहे. मध्य प्रदेशमधील सीहोर जिल्ह्यातील महोडिया गाव हेच ‘फुलेरा’ म्हणून सिरीजमध्ये दाखवण्यात आलं आहे. पंचायत या वेब सिरीजच्या चारही सीझन्सचं चित्रीकरण याच गावात पूर्ण झालं आहे.

पावसामुळे खऱ्या ‘फुलेरा’ची दुरवस्था

वेब सिरीजमध्ये सुंदर दिसणारं फुलेरा हे गाव प्रत्यक्षात तसं अजिबात नसल्याचे दावे समाजमाध्यमांवर केले जात आहेत. यासह युजर्स या गावाचे सध्याचे फोटो व व्हिडीओ देखील शेअर करत आहेत. मध्य प्रदेशमध्ये मान्सून दाखल झाला असून अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस चालू आहे. मात्र या पावसाने फुलेराची म्हणजेच महोडिया गावाची दुरवस्था झाली आहे. गावात पक्का रस्ता नाही, कच्च्या रस्त्यावर सर्वत्र चिखल साचला आहे. या रस्त्यावरून कोणतंही वाहन सहज चालवता येणार नाही इतकी बिकट स्थिती आहे. अनेकांनी पावसाळ्यापूर्वीचे आणि पाऊस सुरू झाल्यानंतरचे फोटो समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत.

महोडियाच्या प्रधानजींचा कारभार फुलेराच्या प्रधानजींसारखाच; समाजमाध्यमांवरून खिल्ली

गावाची अवस्था पाहून लोक म्हणतायत की खऱ्या प्रधानजींनी (सरपंच) देखील त्यांची कामं नीट केलेली नाहीत. म्हणूनच महोडिया गावाची दूरवस्था झाली आहे. बृजभूषण दुबे हे महोडिया गावचे प्रधान होते. मात्र, अलीकडेच झालेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला आणि भूषण शर्मा हे महोडियाचे प्रधान झाले आहेत. मात्र, दोघांच्याही कार्यकाळात गावात पक्का रस्ता बनला नाही, असा दावा समाजमाध्यमांवरून होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खऱ्या फुलेरातील आजी-माजी प्रधानजींची एकमेकांवर टीका

समाजमाध्यमांवरील फोटो व व्हिडीओ पाहून आज तक या वृत्तवाहिनीने महोडिया गावाला भेट दिली. यावेळी लोकांनी सांगितलं की सिरीजमध्ये गावचा विकास दिसत असला तरी प्रत्यक्षात तसं अजिबात झालेलं नाही. ग्रामपंचायत कार्यालयाच्या आसपास सगळीकडेच चिखल साचला आहे. गावात सगळीकडे हीच अवस्था आहे. गावातील पाण्याच्या टाकीखाली गवत उगवलं आहे, ते साफ केलेलं नाही. दरम्यान, सिरीजमध्ये दाखवल्याप्रमाणे खऱ्या फुलेरातील आजी-माजी प्रधानांमध्ये संघर्ष चालू आहे. दोघेही गावच्या विकासावरून एकमेकांवर टीका करत आहेत.