नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत मंगळवारी ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेत काँग्रेस पक्ष व तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली. नेहरूंनी स्वातंत्र्यानंतर जे निर्णय घेतले गेले, त्याची शिक्षा देश आजतागायत भोगत आहे. अक्साई चीनला पडीक जमीन ठरवले गेले. १९६२ व ६३ दरम्यान काँग्रेसचे नेते पूंछ, उरी, नीलम खोरे सोडून देण्याचा विचार करत होते. कच्छच्या रणामधील जमीन देण्याचा विचार होता. हजारो चौरस मीटर जमीन ताब्यात होती. आपण खूप काही करू शकलो असतो, दूरदृष्टी असती तर पाकव्याप्त काश्मीर परत घेतले असते, पण, संधी सोडून दिली असे पंतप्रधानांनी नमूद केले.

निदान करतारपूर साहब तरी ताब्यात घ्यायचे होते. १९७४ ला श्रीलंकेला बेट देऊन टाकले. सियाचीनमधून सैन्य मागे घेण्याचा काँग्रेसचा विचार होता, पण, त्यांना संधी मिळाली नाही. नाहीतर सियाचीनही आपल्याकडे राहिले नसते, असा प्रहार मोदींनी केला. काँग्रेसचे नेते राजनैतिक मुत्सद्देगिरी शिकवत आहेत, त्यांना आठवण करून देतो की, २६ नोव्हेंबरला मुंबईत हल्ला झाला त्यानंतर पाकविरोधात कारवाई करण्याऐवजी विदेशी दबावाखाली पाकिस्तानशी चर्चा सुरू केली. काँग्रेस सरकारने पाकच्या दूतावासातील अधिकाऱ्यांना भारतातून बाहेर काढले नाही. पाकस्तानी पुरस्कृत हल्ले होत राहिले, पाकिस्तानला मोस्ट फेव्हर्ड राष्ट्रांचा दर्जा दिला. मुंबईच्या हल्ल्याचा देश न्याय मागत होता पण, काँग्रेस पाकिस्तानशी व्यापार करत होता. पाक रक्ताची होळी खेळत होता, दहशतवाद्यांना पाठवत होता, काँग्रेस ‘अमन की आस’वर मुशायरा होत होते. हे प्रकार आम्ही बंद केले. आम्ही व्हिसा बंद केला असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

सिंधू जलकरारावरून टीकास्त्र

सिंधू जलकरारावरून मोदींनी नेहरू व काँग्रेसवर सडकून टीका केली. हा करार नेहरूंनी केला. आमच्या नद्यांचे पाणी पाकिस्तानला दिले. नेहरूंनी ८० टक्के पाणी पाकिस्तानला दिले. पण, भारताला फक्त २० टक्के ठेवले, ही कसली मुत्सद्देगिरी होती? नेहरू फक्त तत्कालिक प्रभाव पाहात होते, पाकशी असलेले इतर प्रश्न सुटतील असे वाटत होते पण, तसे झाले नाही, हे नेहरूंनी मान्य केले. या करारामुळे देशाची मोठी हानी झाली. सिंधू करार आम्ही देशहितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी रद्द केला. हा करार असाच पुढे चालू राहू दिला जाणार नाही. रक्त आणि पाणी एकाच वेळी एकत्र वाहू शकणार नाही, असा पुनरुच्चार मोदींनी केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशात २०१४च्या आधी असुरक्षेचे वातावरण होते. दहशतवाद रोखता येतो हे आम्ही ११ वर्षांत दाखवून दिले. दहशतवाद वाढला कारण काँग्रेसने तुष्टीकरणाचे राजकारण केले. दिल्लीत बाटला हाऊसमध्ये दहशतवादी मारले गेले तेव्हा काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या डोळ्यात अश्रू आले. संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरूला वाचवण्याचे प्रयत्न काँग्रेसने केले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी पकडला गेला, तो पाकिस्तानी असल्याचे पाकिस्ताननेही स्वीकारले, पण, काँग्रेसने मतांच्या राजकारणासाठी हा हल्ला भगवा दहशतवाद असल्याचा प्रचार केला. हिंदू दहशतवादी अशी व्याख्या करून देशात हिंदू दहशतवाद पसरवत असल्याची प्रतिमा निर्माण करण्याचा काँग्रेसचा खटाटोप सुरू होता. देशाच्या सुरक्षेचा काँग्रेसने बळी दिला. तुष्टीकरणासाठी दहशतावादविरोधी कायदे रद्द केले, असा हल्लाबोल करून मोदींनी काँग्रेसची कोंडी केली.