Shrikant Shinde In Parliament Session : संसदेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून ऑपरेशन सिंदूरसंदर्भात सभागृहात चर्चा सुरू आहे. या चर्चेवेळी सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. ऑपरेशन सिंदूरवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहेत. आज लोकसभेत शिवसेना (शिंदे) खासदार श्रीकांत शिंदे यांचं भाषण झालं. यावेळी श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार घणाघात केला. तसेच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारवर केलेल्या टीकेलाही श्रीकांत शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूर हा केवळ सरकारचा तमाशा होता, असं विधान खासदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी संसदेत बोलताना केलं होतं. त्यांच्या या विधानावरूनही खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार टीका केली. तसेच श्रीकांत शिंदे संसदेत बोलत असताना विरोधकांनी ५० खोके एकदम ओके’च्या घोषणा दिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे श्रीकांत शिंदे हे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं.

नेमकं काय घडलं?

खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात बोलताना एका कवितेच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक केलं. तसेच ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी न्याय केला असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे मी भारतीय सैनिकांचं अभिनंदन करत आहे. प्रत्येक देसवासीयांमध्ये देशभक्तीची ज्वाळा आहे. मात्र, तरीही विरोधक या ठिकाणी विचारत आहेत की दहशतवादी पहलगाममध्ये कसे आले? त्या दहशतवाद्यांचं पुढे काय झालं?, असं खासदार श्रीकांत शिंदे बोलत असताना विरोधकांनी अचानक जोरदार घोषणाबाजी केली.

विरोधी पक्षातील काही खासदारांनी ‘५० खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना बोलताना अडथळा निर्माण झाला. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे हे चांगलेच संतापले. त्यामुळे श्रीकांत शिंदे विरोधकांना सुनावताना म्हणाले की, “तुम्ही आता मॅच्युअर व्हा, त्यातून (५० खोके एकदम ओके या घोषणेतून) बाहेर या. तुम्ही आता सभागृहात आहात. देशाच्या संसदेत आलेला आहात. तुम्ही महापालिकेत नाहीत”, अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं. त्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी बंद केली.

प्रणिती शिंदे काय म्हणाल्या होत्या?

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलाने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेबाबत लोकसभेमध्ये प्रदीर्घ चर्चा चालू आहे. या चर्चेदरम्यान, विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित करून सरकारला धारेवर धरलं. दरम्यान, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होऊ आहे. प्रणिती शिंदे सभागृहात म्हणाल्या की “ऑपरेशन सिंदूर हे नाव जरी देशभक्तीचं वाटत असलं तरी हा केवळ सरकारचा प्रसारमाध्यमांवरील तमाशा होता. या मोहिमेतून सरकारने काय सिद्ध केलं ते अद्याप कोणालाही समजलेलं नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकताना असं वाटतं की यात देशभक्ती आहे. मात्र, हा प्रसारमाध्यमांवर दाखवला गेलेला सरकारचा एक तमाशा होता. कारण या मोहिमेद्वारे आपण काय साध्य केलं, किती दहशतवाद्यांना पकडलं, शत्रूने आपली किती विमानं पाडली या हल्ल्याला कोण जबाबदारी होतं, यात कोणाची चूक होती, दहशतवादी कुठून आले, आपल्या नागरिकांना ठार मारून दहशतवादी कुठे पळून गेले, यापैकी सरकारला काहीच माहिती नाही. सरकारकडे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही”, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं होतं.