संसदेची नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी मांडला आहे. सध्याची संसद इमारत ही ८८ वर्षे जुनी असून तेथील जागाही कमी पडत आहे. शिवाय त्या इमारतीची स्थितीही अपेक्षेप्रमाणे चांगली नाही. सुमित्रा महाजन यांनी दोन प्रस्ताव मांडले आहेत, त्यानुसार संसद संकुलातच पर्यायी जागा मिळेल किंवा राजपथ येथे संरक्षण व दिल्ली पोलिसांच्या सुरक्षा बराकी आहेत तेथील जागा घेऊन नवी इमारत बांधण्यात यावी.
महाजन यांनी तसे पत्र नागरी विकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांना पाठवले असून नवीन इमारत बांधण्याच्या प्रस्तावाचा विचार करावा, असे म्हटले आहे. सुरुवातीला ही इमारत संसद सदस्य व सचिवालय कर्मचाऱ्यांपुरती होती. आता कामांचा विस्तार वाढला आहे, सुरक्षा गरजाही खूप आहेत, जागा कमी पडत आहे. ही इमारत वारसा दर्जा १ म्हणून जाहीर केल्याने त्यात अनेक मर्यादा आहेत. कुठल्या दुरुस्त्या किंवा बदल करता येत नाहीत. २०२६ नंतर लोकसभा सदस्यांची संख्या आणखी वाढणार आहे. आताची आसन संख्या ५५० असून ती वाढवण्याची कुठलीही शक्यता नाही. सेंट्रल हॉलची क्षमता ३९८ असली तरी तेथे ५५० सदस्यांना बसवता येणार नाही किंवा तेथील आसनक्षमता वाढवता येत नाही. त्यामुळे सुसज्ज व आधुनिक अशी नवी इमारत बांधणेच योग्य ठरेल.