शुक्रवारी मुंबईहून भोपाळला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. जेट एअरवेजच्या संगणक प्रणालीमध्ये तांत्रिक प्रश्न उद्भवल्यामुळे ओव्हरबुकिंग झाले आणि त्यातून ‘अपहरण’ दृश्य परिस्थिती निर्माण झाली होती असा खुलासा जेट एअरवेजच्या अधिकाऱयांनी केला आहे.
एका लग्नाला जाण्यासाठी वऱ्हाडाने तब्बल ८० तिकिटे बुक केली होती. तसेच साधारण प्रवाशांनी देखील तिकिटे बुक केली होती. त्यांना देखील जेट एअरवेजने बोर्डिंग पास देऊ केले होते. जेव्हा हे सर्व लोक विमानात आले तेव्हा त्या ठिकाणी जागेचा प्रश्न निर्माण झाला.
डीजीसीएच्या नियमांप्रमाणे ओव्हरबुकिंग झाल्यानंतर बोर्डिंग पास परत घेऊन त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन जेट एअरवेजने दिले होते परंतु हे आश्वासन धुडकावून लावत वऱ्हाडी मंडळींनी चक्क विमानाचे दारच अडवले. या वऱ्हाडी मंडळींपैकी काहींनी विमानाच्या कर्मचाऱ्यांना लाच देऊ केली होती. तसेच कर्मचाऱ्यांसोबत त्यांची शाब्दिक चकमक देखील झाली होती. या गदारोळामुळे विमानाने सुमारे ७५ मिनिटांनी उशीरा उड्डाण घेतले.
शेवटी लग्नाला जाणाऱ्या मंडळींपैकी काही जणांना उतरविण्यात आले. त्यांना डीजीसीएच्या नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात आली असल्याचे जेट एअरवेजनी सांगितले आहे.