येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर मध्यरात्रीपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. यामध्ये आत्तापर्यंत चार दहशतवादी आणि तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. काल रात्री तीन वाजण्याच्या सुमारास हे दहशतवादी या परिसरात शिरले.
या ठिकाणच्या धारदार ताराचे कुंपण असलेल्या १० फुटांच्या भिंतीवर चढत असताना सर्वप्रथम एक दहशतवादी हवाई दलातील जवानांच्या दृष्टीस पडला. तेव्हा या जवानांनी लगेच गोळीबार करून त्याला कंठस्नान घातले. मात्र, हे सर्व दहशतवादी हीच भिंत चढून आत आले किंवा मुख्य प्रवेशद्वारातून आत आले, याबद्दल आम्हाला नेमकी माहिती नसल्याचे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. कदाचित ते वेगवेगळ्या मार्गांनी आत आले असतील. आम्ही या सगळ्याची माहिती घेत असल्याचेही लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, हे दहशतवादी आत शिरल्यानंतर मुख्य प्रवेशद्वार आणि तांत्रिक विभागाच्या प्रवेशद्वाराच्या मधल्या भागात त्यांची भारतीय जवानांशी गाठ पडली आणि दोन्ही बाजुंनी गोळीबाराला सुरूवात झाली. या भागात हवाई दलाच्या प्रशासकीय इमारती, उपहारगृह आणि अधिकाऱ्यांची घरे आहेत. आमच्याकडे दहशतवादी कोणत्या भागातून कसे आत शिरले याबद्दलची वेगवेगळी माहिती उपलब्ध असून, ती एकत्रित केल्यानंतर लवकरच स्पष्ट चित्र आपल्यासमोर असेल असेही लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jan 2016 रोजी प्रकाशित
पठाणकोट हल्ला: १० फुटांच्या भिंतीवर चढताना मारला गेला पहिला दहशतवादी
काल रात्री तीन वाजण्याच्या सुमारास हे दहशतवादी या परिसरात शिरले.
Written by एक्स्प्रेस वृत्तसेवा

First published on: 02-01-2016 at 16:53 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pathankot attack first terrorist was killed while he was climbing 10 meter high wall