आवडत्या नायकाचे श्रेष्ठत्व ठरवण्यावरून चाहत्यांत वाद, एकाचा खून

पवन कल्याण यांनी विनोदच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले

pawan kalyan, jr, ntr
पवन कल्याण यांनी विनोदच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले व कोणत्याही चाहत्यांनी असे प्रकार न करण्याचे आवाहन केले. छायाचित्र: एएनआय

दक्षिण भारतात चित्रपटातील नायक व राजकीय नेत्यांच्या चाहत्यांबद्दल आतापर्यंत अनेक किस्से आपण ऐकले आहेत. रजनीकांत, राजकुमार यांची तर दक्षिणेत मंदिरे बांधण्यात आली आहेत. अनेकजण आपल्या आवडत्या नायकासाठी आत्महत्याही करतात. कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात मात्र तेलगू चित्रपटसृष्टीतील मेगास्टार पवन कल्याण आणि ज्यु. एनटीआर यांच्या चाहत्यांमध्ये आपलाच नायक कसा श्रेष्ठ यावरून झालेल्या वादात एकाने दुसऱ्याचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना रविवार घडली असून विनोद कुमार (वय २४) असे मृत चाहत्याचे नाव आहे. या माथेफिरू चाहत्याच्या कृत्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
मृत विनोद कुमार हा पवन कुमार याचा चाहता आहे. एका कार्यक्रमात विनोद कुमार व ज्यु. एनटीआरचा चाहता अक्षय कुमार यांच्यात आपल्या आवडत्या नायकावरून वादावादी झाली. त्यावेळी उपस्थित लोकांनी ते भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला. सांयकाळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि अक्षयने विनोदला चाकूने भोसकले. उपचारासाठी विनोदला रूग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
पवन कल्याण यांनी विनोदच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले व कोणत्याही चाहत्यांनी असे प्रकार न करण्याचे आवाहन केले. तेलगू चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री चिरंजीवी यांचे पवन कल्याण हे भाऊ असून ज्यु. एनटीआर हे दिवंगत अभिनेते आणि आंध्रपद्रेशचे तत्कालीन मुख्यमंत्री एनटी रामाराव यांचे नातू आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pawan kalyan jr ntr clash between fans in karanataka one killed

ताज्या बातम्या