जम्मू-काश्मीर विधानसभेच्या मंगळवारी जाहीर झालेल्या निकालानंतर राज्यात कोण सत्ता स्थापन करणार याचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेला पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (पीडीपी) आणि भाजप यांच्यात गेल्या काही दिवसांपासून एकत्र येऊन सत्तास्थापन करण्यासंदर्भात बोलणी सुरू असली तरी, त्याला अपेक्षित यश आलेले नाही. निकालानंतरच्या पाचव्या दिवशी शनिवारी कलम ३७० आणि अफास्पा या मुद्द्यांवर योग्य ती हमी देण्यात आल्यास भाजपशी युती करण्यास तयार असल्याचे पीडीपीकडून सांगण्यात आले. आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असले तरी अद्यापपर्यंत सत्तास्थापनेसाठी कोणत्या पक्षाबरोबर जायचे, याचा निर्णय घेतला नसल्याचे पीडीपीचे प्रवक्ते नईम अख्तर यांनी सांगितले. आमच्याकडून सध्या सर्व पर्यायांची चाचपणी सुरू असून त्यामध्ये भाजपशी युती करण्याचाही पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. आमचा सहकारी पक्ष कोणीही असो, मात्र, आमच्या पक्षाच्यादृष्टीने मुलभूत उद्दिष्टे असणाऱ्या काही गोष्टींविषयी सहकारी पक्षाशी एकमत होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यामध्ये ३७० कलमाला आणखी बळकटी देणे आणि जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणे यांसारख्या अटींचा समावेश असल्याचे त्यांनी म्हटले. याशिवाय, ‘आर्मड् फोर्सेस स्पेशल पॉवर अ‍ॅक्ट’ (अफास्पा) रद्द करणे आणि काश्मीरप्रश्न सोडविण्यासाठी भारताकडून राजकीय प्रयत्न वाढविण्याची हमी सहकारी पक्षाकडून मिळावी, असे नईम अख्तर यांनी सांगितले. यापूर्वी भाजप नेते राम माधव यांनीदेखील पीडीपी आणि भाजप यांच्यात पहिल्या टप्प्याची चर्चा झाल्याचे सांगितले. यामध्ये पीडीपीकडून भाजपसमोर काही प्रमुख अटी ठेवण्यात आल्याचे समजते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीडीपीच्या पाच प्रमुख अटी
* पुढील सहा वर्ष पीडीपीचे मुफ्ती मोहम्मद सईद यांना मुख्यमंत्रिपद दिले जावे.
* शांतता असलेल्या भागातून अफास्पा कायदा काढण्यात यावा.
* घटनेत असलेल्या कलम ३७० ला अधिक मजबूत करण्यात यावे.
* सेल्फ रूल प्रपोजलचा सन्मान केला जावा. म्हणजेच भारत-पाकिस्तान सीमेवर ये-जा करण्यावरील निर्बंध शिथिल करावेत.
* पुरग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष पॅकेज देण्यात यावे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pdp seeks assurance from bjp on article 370 afspa
First published on: 27-12-2014 at 03:37 IST