श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आणि श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. दरम्यान, आता या प्रकरणाची सीबीयायमार्फत चौकशी करावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. तसेच यासंदर्भातील याचिकाही काही वकिलांकडून दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांकडे कर्मचाऱ्यांची कमी आहे. त्यामुळे त्यामुळे त्यांच्याकडून हा तपास योग्यरित्या होत नसून हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाचे पुरावे आणि साक्षीदार शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांकडे पुरेशी तांत्रिक आणि वैज्ञानिक उपकरणं नसल्याचेही या याचिकेत म्हटले आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
मूळची वसई येथील रहिवासी असलेली श्रद्धा वालकर या २६ वर्षीय तरुणीचा तिचा प्रियकर आफताब पूनावालाने खून केल्याचे समोर आले होते. या दोघांमध्ये २०१९ पासून प्रेमसंबंध होते. दोघे एकत्र कॉल सेंटरमध्ये नोकरी करीत होते. तिने या संबंधांची माहिती आपल्या कुटुंबियांनाही दिली होती. मात्र कुटुंबियांनी त्यांच्या आंतरधर्मीय प्रेमसंबंधाला विरोध केला होता. आई-वडिलांचा विरोध डावलून ती आफताबबरोबर नायगाव येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनीही तिच्याशी संबंध तोडले होते. दरम्यान, तिने लग्नाचा तगादा लावल्याने आफताबने तिचा खून केला होता. तसेच तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करत दिल्लीच्या मेहरौली परिसरातील जंगलात फेकून दिले होते.