पिंपरी-चिंचवडचे भाजपाचे पहिले महापौर नितीन काळजे यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे मंगळवार दुपारी अचानक राजीनामा दिला. तत्पूर्वी उपमहापौर शैलजा मोरे यांनी महापौर नितीन काळजे यांच्याकडे राजीनामा दिला होता. गेल्या काही दिवसांपासून दोन नेत्यांच्या शहकाटशहच्या राजकारणामुळे महापौर राजीनामा देण्यार असल्याची चर्चा होती तिला आज पूर्णविराम मिळाला. मात्र यामुळे आता महापौरपदासाठी नव्या इच्छुकांची रस्सीखेच होणार आहे.

महापौर नितीन काळजे यांच्या राजीनाम्यानंतर नामदेव ढाके, राहुल जाधव, शत्रुघ्न काटे, शीतल शिंदे या इच्छुकांची नावे पुढे येत आहेत. चिंचवड येथील मुख्यमंत्र्यांच्या सोमवारच्या दौऱ्यानंतर आज महापौर यांनी राजीनामा दिला, त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा होत आहे. मात्र, महापौर नितीन काळजे यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा देत असून दीड महिना अधिक महापौरपद भुषविले असल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

बऱ्याच नाट्यमय घडामोडीनंतर नितीन काळजे यांना मार्च २०१७मध्ये महापौरपद मिळाले होते. महापौरपदी भोसरीचे नितीन काजळे आणि उपमहापौरपदी पिंपरीच्या शैलजा मोरे यांची बिनविरोध निवड झाली होती. अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापौर आणि उपमहापौर निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे भाजपला विजय सोपा झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र, अचानकपणे राष्ट्रवादीने महापौरपदासाठी श्याम लांडे यांना अर्ज भरायला लावला होता तर उपमहापौरपदासाठी निकिता कदम यांनी अर्ज भरला होता. त्यामुळे निवडणूक रंगतदार होणार अशी चिन्हे होती. परंतू, पीठासीन अधिकाऱ्यांनी दिलेल्या पंधरा मिनिटांच्या मुदतीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांनी माघार घेतली होती. त्यामुळे भाजपच्या गोटात महापौरपदी नितीन काजळे तर उपमहापौरपदी शैलजा मोरे यांना बिनविरोध घोषित केले गेले होते. त्यानंतर महापौर यांना कुणबी जात प्रमाणपत्रामुळे अनेक अडचणींना सामोरे जाव लागले होते.