Piyush Goyal On trade talks with US : भारत आणि अमेरिका यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून व्यापारी तणावाची स्थिती आहे. यादरम्यान केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. भारत कोणत्याही व्यापारासंबंधी करारावर घाईने स्वाक्षरी करणार नाही. तसेच भारताचे व्यापाराचे पर्याय मर्यादीत करणाऱ्या सहकारी देशांनी घातलेल्या अटी नाकारल्या जातील असे विधान शुक्रवारी पीयूष गोयल यांनी केले. त्यांचे हे विधान अमेरिकेसारख्या बड्या भागीदार देशांबरोबर सुरू असलेल्या व्यापारासंबंधी वाटाघाटींच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले आहे.
पीयूष गोयल यांनी त्यांच्या अधिकृत भेटीदरम्यान बर्लिन ग्लोबल डायलॉगमध्ये बोलताना स्पष्ट केले की, व्यापार करार हे फक्त टॅरिफ किंवा बाजारपेठेत प्रवेशापुरतेच नसतात, तर ते विश्वास निर्माण करणे, दीर्घ काळासाठीचे संबंध आणि ग्लोबल बिझनेस कोऑपरेशनसाठी शास्वत फ्रेमवर्क तयार करण्याकरिता असतात.
भारताचे युरोपियन युनियनबरोबर अनेक दिवसांपासून प्रलंबित मुक्त व्यापार करार करण्यासाठी वाटाघाटी करत आहे, मात्र बाजारपेठेत प्रवेश, पर्यावरणीय मानके, आणि रूल्स ऑफ ओरिजीनच्या मुद्द्यावरून अजूनही मतभेद कायम आहेत. तसेच इतर देशांबरोबरच भारतीय निर्यातीवर ५० टक्के टॅरिफ लादणाऱ्या अमेरिकेबरोबरही व्यापारी वाटाघाटी केल्या जात आहे.
रशियाकडून भारताने तेल खरेदी करणे सुरू ठेवल्याबद्दल युरोपीय देशांनी व्यक्त केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर गोयल यांनी स्पष्ट केले की भारत विचारपूर्वक निर्णय घेईल. ते म्हणाले की, “भारत कोणत्याही व्यापार करारावर घाईने स्वाक्षरी करणार नाही.” अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या व्यापारी वाटाघाटीसंदर्भ बोलताना गोयल म्हणाले की, “एका अल्प मुदतीच्या संदर्भात, हे फक्त पुढील सहा महिन्यांत काय होईल याबद्दल नाही. तसेच हे फक्त अमेरिकेला पोलाद विकता येण्याबद्दल नाही.”
त्यांनी पुढे बोलताना भर दिला की, भारताची व्यापार वाटाघाटींबाबतची भूमिका ही दीर्घकाळासाठीच्या धोरणावर आधारित आहे, तातडीचे व्यापर लक्ष्य गाठण्याच्या दबावावर नाही. ते म्हणाले, “व्यापार करार हे दीर्घकाळासाठी असतात. ते फक्त टॅरिफबद्दल नसतात, तर ते विश्वास आणि संबंधांबद्दलही असतात. तसेच व्यापार करार व्यवसायासाठीही असतात.” इतर अनेक महत्त्वाच्या विषयांबरोबर भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारावर (India-EU FTA) चर्चा करण्यासाठी गोयल सध्या जर्मनीमध्ये आहेत.
