पीटीआय, नवी दिल्ली
भारत आणि अमेरिकेदरम्यान द्विपक्षीय व्यापार करारावरील चर्चा योग्य दिशेने असल्याची ग्वाही परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी दिली. तर, वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल येत्या काही दिवसांमध्येच अमेरिकेला जाण्याची अपेक्षा आहे अशी माहिती सूत्रांनी शुक्रवारी दिली. अमेरिकेने भारतीय मालावर ५० टक्के आयातशुल्क लादल्यामुळे दोन्ही देशांदरम्यान तणाव निर्माण झाला असून त्याचा परिणाम व्यापार कराराच्या चर्चेवरही झाला होता. मात्र, आता ती पुन्हा सुरळीत झाल्याचे चित्र आहे.
अमेरिकेतर्फे वाटाघाटी करणारे प्रमुख अधिकारी ब्रेंडन लिंच आणि भारताचे प्रतिनिधित्व करणारे वाणिज्य मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश अग्रवाल यांच्यादरम्यान १६ सप्टेंबरला चर्चा झाली. दोन्ही बाजूंच्या अधिकाऱ्यांदरम्यान सात तास चर्चा सुरू होती. ही चर्चा सकारात्मक होती, तसेच हा करार लवकरात लवकर करण्यासाठी प्रयत्न करण्यावर एकमत झाल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारीत व्यापार चर्चेसाठी वाटाघाटी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते.
दुसरीकडे, दोन्ही देशांना फायदेशीर असलेला द्विपक्षीय व्यापार करार लवकर करण्यासाठी प्रयत्न वाढवण्यावर सहमती झाली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.
टिकटॉक करारासाठी ट्रम्प-जिनपिंग चर्चा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचे शुक्रवारी दूरध्वनीवरून संभाषण झाले. त्यामध्ये टिकटॉक कराराबद्दल अधिक प्रगती झाल्याचे सांगण्यात आले. दोन्ही नेते ३१ ऑक्टोबरला दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या आशिया-प्रशांत आर्थिक सहकार्य परिषदेच्या निमित्ताने भेटणार आहेत. ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर लिहिले की, आम्ही व्यापार, टिकटॉक कराराला मंजुर, फेन्टानिल, रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याची गरज अशा अनेक मुद्द्यांवर प्रगती केली. चीनकडून मात्र टिकटॉक कराराला अंतिम स्वरूप दिले गेल्याचे सांगितले गेले नाही.