six killed in Ohio Plane Crash : गुजरातच्या अहमदाबाद येथे काही दिवसांपूर्वी एअर इंडियाचे विमान टेक ऑफ केल्याच्या काही मिनिटांतच कोसळल्याची भीषण घटना घडली होती. या दुर्घटनेत २७० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता तर विमानातील अवघा एक प्रवासी बचावला होता. दरम्याच असाच काहीसा भीषण प्रकार अमेरिकेतली ओहायो विमातळावर घडला आहे. येथे देखील उड्डाण केल्याच्या अवघ्या काही मिनिटांतच एक लहान विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत सुट्टीवर निघालेल्या चार जणांच्या कुटुंबासह विमानाचे दोन्ही वैमानिक यांचा मृत्यू झाला आहे. अधिकार्यांनी या दुर्घटनेबद्दल माहिती दिली आहे.
फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशनने दिलेल्या माहितीनुसार, ट्विन-इंजिन Cessna 441 टर्बोप्रोप हे विमान यंगस्टाउन-वॉरेन प्रादेशिक विमानतळ येथे रविवारी सकाळी कोसळले. या दुर्घटनेत विमानातील एकही प्रवासी बचावला नाही अशी माहिती वेस्टर्न रिझर्व्ह पोर्ट अथॉरिटीचे कार्यकारी संचालक अँथनी ट्रेव्हेना यांनी माध्यमांशी बोलताना दिली.हे विमानतळ या संस्थेच्या मालकीचे आहे.
ओहाओ विमान दुर्घटनेतील प्रवाशांची ओळख पटली
एजन्सीने केलेल्या नोंदीनुसार, विमान हे ओहाओ येथील वॉरेनच्या मिनडर एअर एलएलसीकडे नोंदवण्यात आलेले होते. ट्रम्बल काउंटीचे कोरोनेर लॉरेन्स डीअमिको यांनी सोमवारी पीडितांबद्दल माहिती दिली. यामध्ये पायलट जोसेफ मॅक्सिन (६३), को-पायलट टिमथी ब्लेक (५५) आणि प्रवासी वेरोनिका वेल्लर (६८) त्यांचे पती जेम्स वेल्लर (६७) मुलगा जॉन वेल्लर (३६) आणि त्यांची पत्नी मारिया वेल्लर (३४) यांचा समावेश आहे. ब्लेक आणि इतर प्रवासी हे हब्बार्ड येथील तर मॅक्सिन हे कॅनफिल्ड येथील रहिवासी होते.
यंग्सटाउन-व़ॉरेन भागात स्टील उत्पादनाच्या कारखाने असलेले कुटुंब हे मॉन्टेना येथे सुट्ट्या खालवण्यासाठी निघाले होते, अशी माहिती डीअमिको यांनी दिली. तर मॅक्सिम हे पोर्ट अथॉरिटी डायरेक्टर ऑफ कंप्लायन्स होते आणि याबरोबर ते माहोनिंग काउंटी प्रोसिक्युटर्स ऑफिसचे माजी असिस्टंट प्रोसिक्युटर देखील होते.
दरम्यान विमान हे घनदाट जंगलात कोसळल्याने दुर्घटनेच्या ठिकाणापर्यंत पोहचण्यात अडचणी येत होत्या, अशी माहिती हाउलंड टाउनशीप फायर चिफ रेमंड पेस यांनी दिली.
“ही अत्यंत दुख:द परिस्थिती आहे, पण हे अजून भयानक ठरू शकले असते,” असे पेस म्हणाले, जेथे विमान कोसळले तेथे जवळपास तीन घरे देखील होती असे त्यांनी यावेळी नमूद केले. सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या फ्लाइट ट्रॅकिंग डेटानुसार विमान हे बोझेमन, मोंटाना येथे जात होते असे विमान कंपनी जेईटीएस एफबीओ नेटवर्कचे अध्यक्ष मायकेल हिलमन यांनी सांगितले.
दरम्यान एफएए आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड हे या अपघाताचा तपास करत आहेत, मात्र त्यांनी अपघाताचे कारण काय असू शकते याबद्दल कोणतेही विधान केले नाही. तसेच त्यांनी नागरिकांना त्यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अपघात रेकॉर्ड झाला असेल किंवा तपासात मदत करू शकेल अशी इतर काही माहिती असेल तर त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
एअर इंडिया विमान दुर्घटना
गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळले होते. या दुर्घटनेत दोन वैमानिक, १० क्रू सदस्य आणि २३२ प्रवासी असे एकूण २४२ लोक विमानात होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश, १ कॅनडा आणि पोर्तुगालचे ७ नागरिक होते. या दुर्घटनेत २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर एक जण बचावला होता. हे विमान मेडिकल कॉलेजच्या परिसरात कोसळल्याने जमिनीवरील अनेक जणांचा देखील या दुर्घटनेत मृत्यू झाला होता.