पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मुलाखतीत बालाकोट एअरस्ट्राइकबाबत आणि १९८७-१९८८ च्या सुमारास डिजिटल कॅमेरा आणि ईमेलच्या वापराबाबत केलेल्या विधानांवरुन मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मात्र, या संपूर्ण मुलाखतीचं कथानक आधीच तयार होतं आणि त्यातील प्रश्न देखील ठरवून विचारण्यात आले, असा गंभीर आरोप मोदींवर काँग्रेस आणि विरोधकांकडून करण्यात येत आहे. यापूर्वीही अनेकदा मोदींवर मुलाखत आधीच फिक्स करण्याचे आरोप झाले आहेत.

काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख दिव्या स्पंदना यांनी या मुलाखतीच्या काही भागाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओद्वारे मोदींच्या मुलाखतीचे प्रश्न आधीच ठरले होते असा आरोप करण्यात आला आहे. याशिवाय स्पंदना यांनी, ‘आता आम्हाला कळलं की मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत, किंवा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबत खुली चर्चा का करत नाहीत’ असा टोलाही लगावला आहे.

व्हायरल व्हिडिओत मोदींच्या हातात काही कागद दिसत असून त्यावर हिंदीतून कविता छापलेली दिसत आहे, तसंच ‘सवाल संख्या 27’ असंही लिहिलेलं दिसतंय. कवितेच्या वरती काही प्रश्न लिहिलेले दिसतायेत आणि तेच प्रश्न मुलाखत घेताना विचारण्यात आले होते अशी टीका मोदींवर केली जात आहे.


दिव्या स्पंदना यांनी हा व्हिडिओ ट्विट करत लोकांना हा व्हिडिओ पाहताना तिसऱ्या सेकंदाला व्हिडिओ पॉज करण्याचं आवाहन केलं आहे. ‘व्हिडिओ पॉज केल्यावर कागदावर लिहिलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरंही दिसत आहेत…आता आम्हाला कळलं की मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत, किंवा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबत खुली चर्चा का करत नाहीत’…असा टोलाही स्पंदना यांनी लगावला आहे.


काय म्हणाले होते मोदी –
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा रंगीत फोटो काढण्यासाठी आपण १९८७-१९८८ च्या सुमारास डिजिटल कॅमेऱ्याचा वापर केला होता. तसंच हा फोटो ईमेलच्या सहाय्याने पाठवला होता, असं मोदी यांनी म्हटलं आहे. याशिवाय, बालाकोट एअर स्ट्राइकदरम्यान ढगाळ वातावरणामुळे तज्ज्ञ मोहीम पुढे ढकलण्याच्या विचारात होते, पण ढगाळ वातावरणाचा आपल्या विमानांना रडारपासून वाचण्यासाठी फायदा होऊ शकतो असा सल्ला मी दिला होता, असंही विधान मोदींनी केलं.