लंडन : तीन वर्षांपेक्षा जास्त काळ चाललेली खलबते, ब्रिटनमधील अनेक सत्तांतरे आणि प्रदीर्घ वाटाघाटींनंतर अखेर भारत आणि ब्रिटनमधील ‘मुक्त व्यापार करार’ अस्तित्वात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या साक्षीने वाणिज्यमंत्री पीयूष गोयल आणि ब्रिटनचे व्यापार सचिव जोनाथन रेनॉल्ड यांनी या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. करारामुळे भारतातील बहुतांश उत्पादनांना ब्रिटनमध्ये करमुक्त प्रवेश मिळेल, तर ब्रिटनमधील चारचाकी वाहने, मद्य आदी स्वस्त होईल.

‘सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार’ (इकोनॉमिक अँड ट्रेड ॲग्रिमेंट – सीईटीए) असे नाव असलेल्या या महाकरारामुळे भारतीयांना मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला. भारत आणि ब्रिटन हे नैसर्गिक भागीदार असून दोन्ही देशांमध्ये नवा इतिहास सुरू होत असल्याचे ते म्हणाले. भारतातील वस्त्रोद्योग, पादत्राणे, हिरे आणि दागिने, मत्स्योद्योग आणि उत्पादित वस्तूंना ब्रिटनची मोठी बाजारपेठ मिळणार असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. तर आतापर्यंतच्या अनेक सरकारांनी प्रयत्न केला, मात्र आपल्या कार्यकाळात हा करार अस्तित्वात आल्याचे स्टार्मर यांनी अधोरेखित केले. या करारामुळे ब्रिटनमधील मद्य उत्पादनांचे भारतातील व्यापर शुल्क १५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांपर्यंत खाली येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

सेवाक्षेत्राला चालना

या कराराबरोबरच ‘दुहेरी योगदान पद्धती’देखील (डीसीसी) अस्तित्वात येणार असून त्यामुळे दोन्ही देशांतील सेवाक्षेत्राला नवी उभारी येणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. विशेषत: तंत्रज्ञान आणि वित्तक्षेत्रांना अधिक फायदा होणार आहे. ‘डीसीसी’मुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार सुलभता, खर्चामध्ये कपात होऊन व्यवसायाचा आत्मविश्वास वाढेल, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात कुणाला फायदा?

– कोकणातील हापूस आंबे, फणस

– नाशिकची द्राक्षे, कांदा

– कोल्हापुरी चप्पल

– सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग

– सेवाक्षेत्रात रोजगाराच्या संधी

कराराची वैशिष्ट्ये

– येत्या तीन वर्षांत ब्रिटनला होणाऱ्या कृषी उत्पादन निर्यातीत २० टक्के वाढ अपेक्षित.

– भारतीय नोकरदारांना ब्रिटनमध्ये रोजगाराच्या अधिक संधी उपबल्ध.

– ब्रिटनमधून गुंतवणूक वाढल्याने देशांतर्गत रोजगार निर्मितीलाही बळ.

– ब्रिटनमधील सुमारे ७५ हजार भारतीयांना ‘सामाजिक सुरक्षा शुल्का’तून तीन वर्षांसाठी सूट.

– ब्रिटनमधून आयात होणारी वाहने, मद्य आदी उत्पादनांचे सीमा शुल्क १५ टक्क्यांवरून तीन टक्क्यांवर.

– भारतातील ९९ टक्के निर्यातीला ब्रिटनमधील व्यापार करातून १०० टक्क्यांपर्यंत सूट.

भारतातील कृषी उत्पादनांसाठी ब्रिटनच्या बाजारपेठेत अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. याचा भारतातील तरुण, शेतकरी, मच्छीमार आणि सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग क्षेत्राला सर्वाधिक लाभ होईल. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

युरोपीय महासंघ सोडल्यानंतर ब्रिटनने केलेला हा सर्वांत मोठा आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा व्यापार करार आहे. यामुळे ब्रिटनची दारे व्यापारासाठी खुली असल्याचा संदेश जगात गेला आहे. – कीर स्टार्मर, पंतप्रधान, ब्रिटन

अभियांत्रिकी

– ब्रिटन हा भारतासाठी सहावा सर्वात मोठा अभियांत्रिकी निर्यात बाजार आहे. २०२४-२५ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ११.७ टक्के वाढीसह मजबूत व्यापार गतीची नोंद.

– निरोगी वाढीचे अंदाज : विद्युत यंत्रे, वाहनांचे सुटे भाग, औद्योगिक उपकरणे आणि बांधकाम यंत्रसामग्री यांसारख्या प्रमुख अभियांत्रिकी उत्पादनांची निर्यात १२.२० टक्के सीएजीआरने वाढण्याचा अंदाज.

इलेक्ट्रॉनिक्स आणि सॉफ्टवेअर :

– शून्य शुल्कामुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या निर्यातीला गती मिळण्याची अपेक्षा. स्मार्टफोन, ऑप्टिकल फायबर केबल्स आणि इन्व्हर्टरमुळे ब्रिटन बाजारपेठेत भारताचा पाया मजबूत होईल.

– नवीन बाजारपेठा उघडण्यासाठी, रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी आणि भारतीय सॉफ्टवेअर कंपन्यांची निर्यात क्षमता वाढवण्यासाठी सॉफ्टवेअर आणि आयटी-सक्षम सेवांमध्ये ब्रिटनची महत्त्वाकांक्षी वचनबद्धता; २०२४-२५ मध्ये सध्याच्या ३२ अब्ज डॉलरवरून १५-२० टक्के वार्षिक वाढ अपेक्षित.

औषधे

– औषध क्षेत्रात भारत जागतिक स्तरावर २३.३१ अब्ज डॉलरची निर्यात करतो आणि ब्रिटन जवळजवळ ३० अब्ज डॉलरची आयात करतो. परंतु भारतीय औषधनिर्माण क्षेत्र १ अब्ज डॉलर्सहून कमी मूल्याचे आहे, ज्यात वाढ अपेक्षित आहे.

– मुक्त करारात शून्य शुल्क तरतुदींमुळे ब्रिटनच्या बाजारपेठेत भारतीय जेनेरिक्स औषधणांची स्पर्धात्मकतारीत्या वाढ अपेक्षित. युरोपमध्ये भारतातील जेनेरिक्स औषधांची सर्वात मोठी निर्यात होते.

– शस्त्रक्रिया उपकरणे, निदान उपकरणे, ईसीजी यंत्र, एक्स-रे यंत्रे यासारख्या वैद्यकीय उपकरणांच्या संख्येवर कोणतेही शुल्क आकारणी नाही. भारतीय वैद्यकीय-तंत्रज्ञान कंपन्यांचा खर्च कमी होईल.

रसायने

– मुक्त करारामुळे भारताच्या ब्रिटनमधील रासायनिक निर्यातीत ३०-४० टक्के वाढ होण्याची अपेक्षा. ज्यामुळे २०२५-२६ मध्ये अंदाजे ६५०-७५० दशलक्ष डॉलरची निर्यात अपेक्षित.

– रसायने आणि संबंधित उत्पादनांमध्ये भारत जागतिक स्तरावर ४०.५२ अब्ज डॉलरपेक्षा जास्त निर्यात करतो, तर ब्रिटनची आयात ३५.११ अब्ज डॉलरची आहे. मुक्त करारामुळे सुधारित बाजारपेठ वाढीला चालना

प्लास्टिक

– प्लास्टिक, फिल्म, शीट्स, पाइप्स, पॅकेजिंग, टेबलवेअर आणि स्वयंपाकघरातील वस्तूंसाठी शून्य शुल्क. या वस्तूंना ब्रिटनमध्ये अधिक मागणी असल्याने फायदा होण्याची शक्यता

– शुल्कमुक्तीमुळे भारताला जर्मनी, चीन, अमेरिका, नेदरलँड्स, बेल्जियम आणि फ्रान्स यांसारख्या ब्रिटनच्या प्रमुख आयात स्रोतांशी चांगली स्पर्धा करण्याची संधी

– अंदाजित वाढ १५ टक्के आहे आणि २०३० पर्यंत १८६.९७ दशलक्ष डॉलरचे लक्ष्य.

क्रीडा साहित्य/ खेळणी

– फुटबॉल, क्रिकेटचे साहित्य, रग्बी बॉल आणि साध्या (इलेक्ट्रॉनिक नसलेल्या) खेळण्यांची निर्यात वाढणार.

– भारतीय क्रीडा साहित्य आणि खेळण्यांना ब्रिटनमध्ये आयात शुल्क रद्द केल्याने फायदा होईल.

रत्ने आणि दागिने

– भारताकडून ब्रिटनला एकूण रत्ने व दागिने क्षेत्रातील निर्यात ९४१ दशलक्ष डॉलर आहे, ज्यामध्ये ४०० दशलक्ष डॉलर दागिन्यांमधून येतात. ब्रिटन दरवर्षी अंदाजे ३०० कोटी डॉलर किमतीचे दागिने आयात करत असल्याने मुक्त करारामुळे एक मोठी बाजारपेठ खुली.

– शुल्क सवलतींमुळे पुढील २-३ वर्षांत भारताची रत्ने आणि दागिन्यांची निर्यात ब्रिटनला दुप्पट होण्याचा अंदाज.

चर्मोद्योग

– भारतातील चर्म आणि पादत्राणे यांवरील शुल्क १६ टक्क्यांवरून शून्यावर आणल्याने भारताच्या कारागिरीला जगभरात उंच भरारी घेण्याची संधी.

– मुक्त करारामुळे १-२ वर्षांत ब्रिटनच्या बाजारपेठेत ५ टक्के हिस्सा वाढण्याचा अंदाज. निर्यात ९०० दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा.

– आग्रा, कानपूर, कोल्हापूर, चेन्नई यांसारख्या चर्मोद्योगांच्या केंद्रामधील सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांना शुल्कमुक्त निर्यातीचा फायदा.

इतर

* प्रमुख कामगारकेंद्रित क्षेत्रांमध्ये, सागरी उत्पादनांवर पूर्वी २० टक्के, कापड आणि तयार कपड्यांवर १२ टक्के, रसायनांवर ८ टक्के आणि हिणकस धातूवर १० टक्के शुल्क होते. ते आता शून्य करण्यात आले.

* प्रक्रिया केलेल्या अन्न क्षेत्रात ९९.७ टक्के उत्पादनांवरील शुल्क ७० टक्क्यांवरून शून्य करण्यात आले, ज्यामुळे भारतीय निर्यातदारांना मोठी चालना.

भारतीय सेवा क्षेत्रे :

* मुक्त करारामुळे भारतीय व्यावसायिकांसाठी गतिशीलता सुलभ होईल. ब्रिटिश उद्योगांसाठी विशिष्ट प्रकल्पांवर काम करणाऱ्या कंत्राटी सेवा पुरवठादारांना फायदा.

* स्वतंत्र व्यावसायिकांना फायदा. योग प्रशिक्षक, शास्त्रीय संगीतकार आणि शेफ यांसारख्या कुशल व्यक्तींना ब्रिटनमध्ये त्यांच्या सेवा देणे सुलभ होईल.

नवोपक्रम क्षेत्र :

* नावीन्यपूर्ण प्रक्रियांना समर्थन देणे आणि नावीन्यपूर्ण उत्पादनांमध्ये व्यापार करणे हे उद्दिष्ट.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* शिक्षण आणि विकासासाठी गतिमान वातावरण निर्माण करून उदयोन्मुख आणि परिवर्तनशील तंत्रज्ञानावर संयुक्त उपक्रमांसाठी तरतुदी.