कोलकाता : ‘तृणमूल काँग्रेससह विरोधी ‘इंडिया’ आघाडी भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने उचललेल्या कायदेशीर पावलांना विरोधकांकडून वारंवार विरोध होत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे केला. या आठवड्याच्या सुरुवातीला संसदेत सादर केलेल्या संविधान (१३० वी दुरुस्ती) विधेयक, २०२५ चा अप्रत्यक्ष उल्लेख करत, व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी नवीन विधेयक आवश्यक आहे, असे मोदी यांनी अधोरेखित केले.
कोलकाता येथे एका सभेला संबोधित करताना मोदींनी आपल्या सरकारच्या विधेयकाबाबतच्या निर्णयाचे समर्थन केले. या विधेयकात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना ३० दिवस किंवा त्याहून अधिक काळ तुरुंगात राहिल्यास पदावर राहण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आहे, असे मोदींनी सांगितले. प्रस्तावित कायद्यातील तरतुदींचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले, ‘आम्ही असा कायदा आणण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये भ्रष्ट मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान ३० दिवस तुरुंगात राहिल्यास त्यांनाही पदावरून काढून टाकण्याची तरतूद आहे.’ परंतु जेव्हा आम्ही कडक कायदा आणला तेव्हा काँग्रेससह तृणमूल काँग्रेसने विरोध करण्यास सुरुवात केली. ते या कायद्यावरून संतप्त आहेत, कारण त्यांना स्वतःच्या पापांची शिक्षा भोगावी लागण्याची भीती आहे, असा टोला मोदींनी लगावला.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करताना मोदी म्हणाले की, ‘हे लाजिरवाणे आहे की एक मुख्यमंत्री तुरुंगात गेल्यानंतरही तिथून सरकार चालवत आहे.’ पश्चिम बंगालमध्येही हीच स्थिती आहे. तेथे शिक्षक भरती घोटाळ्यात अटक झालेले माजी मंत्री पार्थ चॅटर्जी आणि रेशन वाटप घोटाळ्यात अटक झालेले ज्योती प्रिया मल्लिक पद सोडण्यास तयार नव्हते. ‘भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झालेले लोक सरकारचा भाग कसे राहू शकतात, ते त्यांच्या पदांवर कसे राहू शकतात? मोदी हे होऊ देणार नाहीत,’ असे पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले.
उन्नत कोना एक्स्प्रेस वेची पायाभरणी, तीन मेट्रो प्रकल्पांचे लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता येथे तीन नवीन मेट्रो मार्गांचे उद्घाटन करण्याबरोबरच १,२०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या सहा पदरी ‘कोना एक्सप्रेसवे’ प्रकल्पाची पायाभरणी केली. ७.२ किमी लांबीच्या कोना एक्स्प्रेसवेमुळे हावडा, लगतचा ग्रामीण भाग आणि कोलकाता यांच्यातील जोडणी सुलभ होणार आहे. तसेच प्रवासाचा वेळ वाचेल, व्यापाराला चालना मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी, पंतप्रधानांनी १३.६१ किमी लांबीच्या ग्रीन, यलो आणि ऑरेंज लाईन्सच्या तीन नवीन मेट्रो सेवांना हिरवा झेंडा दाखवला. ‘भारतात जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे मेट्रोचे जाळे आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. उल्लेखनीय म्हणजे, २०१४ पूर्वी देशात फक्त २५० किमी मेट्रो मार्ग होते. आज हा आकडा १००० किमीहून अधिक झाला आहे,’ असे मोदी या वेळी म्हणाले.