राफेल विमान खरेदीवरून सुरू असलेल्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखेर मौन सोडले. भाजप सरकारमध्ये क्वात्रोची मामा आणि ख्रिश्चियन अंकल नसल्यामुळेच काँग्रेस आंदोेलन आणि खोटं बोलून भाजप सरकारच्या संरक्षण खरेदीवर आदळआपट करीत आहे. आता तर काँग्रेस न्यायालयावरही अविश्वास दाखवत आहे, असा हल्लाबोल मोदी यांनी सोनिया गांधी यांचा मतदार संघ असलेल्या रायबरेलीतून केला.

रायबरेलीत रेल्वे कोच फॅक्टरीसह विविध विकासकामांचे उद््घाटन मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी झालेल्या सभेत मोदी यांनी काँग्रेसवर निशाना साधला. संरक्षण खरेदी व्यवहारात काँग्रेसचा इतिहास बोफोर्स घोटाळ्यातील क्वात्रोचीचा राहिला आहे. काही दिवसांपूर्वीच हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी ख्रिश्चियन मिशेलला भारतात आणले गेले आहे. या आरोपीला वाचविण्यासाठी काँग्रेसने आपला वकील न्यायालयात पाठविल्याचे सगळ्यांनी पाहिले आहे. काँग्रेसने देशाच्या वायू दलाला कधीही मजबूत होऊ दिले नाही. कारगिल युद्धानंतर भारतीय वायू दलाने आधुनिक विमानाची गरज असल्याची मागणी केली. पण, अटलजींच्या सरकारनंतर दहा वर्षे देशाच्या सत्तेवर असलेल्या काँग्रेसने वायू सेनेला मजबूत होऊ दिले नाही. असे का केले? कुणाचा दबाव होता? असा सवाल मोदींनी यावेळी उपस्थित केला.

काँग्रेसचे नामोल्लेख टाळत मोदी म्हणाले, अशा लोकांसाठी देशाचे संरक्षण मंत्रालय खोटे आहे. देशाच्या संरक्षण मंत्री खोट्या आहेत. भारतीय वायू सेनेचे अधिकारीही खोटे आहेत. फ्रान्सचे सरकारही खोटे आहे. आता त्यांना देशाचे सर्वोच्च न्यायालयही खोटे वाटू लागले आहे, असा टोेला मोदींनी यावेळी लगावला.

कर्जमाफीच्या नावावर काँग्रेस शेतकऱ्यांशी खोटं बोलतेय

कर्नाटकमध्ये सरकार आल्यानंतर दहा दिवसात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं आश्वासन काँग्रेसने दिलं होत. पण, सहा महिने लोटले तरी एक हजार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीच्या नावावर काँग्रेस शेतकऱ्यांना खोटं बोलत आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. काँग्रेसच्या राज्यात ना जवानांची गोष्ट केली जात होती ना शेतकऱ्यांची. मात्र भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्यासाठी धोरण तयार केली. त्याची अंमलबजावणी केली. एमएसपीच्या एका निर्णयामुळे देशातील शेतकऱ्यांना ६० हजार कोटी रुपयांचा फायदा होणार आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने स्वामीनाथ आयोगाचा अहवाल लागू केला. खरीप आणि रब्बीतील २२ पिकाचे भाव निश्चित केले आहेत, असे मोदी यांनी सांगितले. काँग्रेसच्या काळात शेतकरी विम्याचा हफ्ता १५ टक्के घेतला जात होता. भाजप सरकारने पीकविमा योजनेच्या माध्यमातून १ ते ५ टक्केच हफ्ता घेतला.तर ३३ हजार कोटी रुपये पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना दिले. ७० वर्षात शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढविण्याचा विचार जर कोणत्या सरकारने केला असेल तर तो भाजप सरकारने केला आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदींच्या सभेकडे रायबरेलीकरांची पाठ
तीन राज्यात काँग्रेसने भाजपला धोबीपछाड दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी काँग्रेसचा गढ असलेल्या रायबरेलीचा दौरा केला. विकासकामांच्या उद््घाटनानंतर मोदींची सभा झाली. या सभेला यशस्वी करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपचे नेते झपाटून काम करीत होते. मात्र, या सभेकडे रायबरेलीकरांनी सपशेल पाठ फिरवली होती. सभेच्यावेळी निम्म्याहून अधिक खुर्र्च्या रिकाम्याच होत्या. विशेष म्हणजे सभेविषयी लोकांमध्ये फारसा उत्साहही दिसून आला नाही. त्यामुळे निर्धारित वेळेच्या एक तास उशिराने सभा सुरू करण्यात आली होती.