पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी नऊ वाजता गुरु रविदास विश्वराम धाम मंदिराला भेट देणार आहेत. दिल्लीतील करोलबाग येथे असणाऱ्या या मंदिरात बुधवारी रविदास जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे त्याचनिमित्ताने मोदी ही भेट देणार आहेत.

गुरु रविदास जयंतीचा उत्सव पंजाबमधील दलित सामाजामधील लोकांकडून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. राज्यामधील ३० टक्के जनता याच समाजातील असून लवकरच या राज्यात विभानसभेची निवडणूक होणार असल्याने या मंदिर भेटीमागील राजकीय कनेक्शनसंदर्भात चर्चा सध्या जोरात आहे.

पंतप्रधान मोदींनीच मंगळवारी यासंदर्भातील माहिती ट्विट करुन दिली. “रविदास जयंतीच्या पवित्र मुहूर्तावर उद्या सकाळी नऊ वाजता मी दिल्लीतील करोलबागमधील श्री गुरु रविदास विश्राम धाम मंदिरात जाणार आहे. येथे मी लोककल्याणासाठी प्रार्थना करणार आहे,” असं मोदींनी म्हटलंय.

याच रविदास जयंतीच्या उत्सवासाठी पंजाबमधील मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात आलीय. १४ फेब्रुवारी रोजी मतदान ठेवल्यास या उत्सवामुळे अनेकांना मतदान करता येणार नाही. म्हणून मतदानाची तारीख पुढे ढकलावी अशी मागणी भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने केली होती. निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य करत १४ फेब्रुवारीचं मतदान २० फेब्रुवारी रोजी घेण्याचा निर्णय घेतलाय. दिल्ली सरकारनेही आज रविदास जयंतीच्यानिमित्ताने राज्य सरकारअंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर केलीय.