कोणत्याही परिस्थितीत विकासाच्या मुद्दय़ापासून दूर न जाण्याची सूचना करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना ‘मर्यादा’ पाळण्याचा सल्ला दिला. ऊठसूट कोणत्याही मुद्दय़ावर मत नोंदवणे बंद करा, असा दम त्यांनी पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत भरला. अलीकडेच भाजपच्या साक्षी महाराजांनी महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला ‘देशभक्त’ उपाधी दिली होती. त्यामुळे सभागृहात भाजपवर नामुष्कीची वेळ आली होती.
साक्षी महाराजांनी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे कसाबसा हा विषय संपवण्यात भाजपला यश आले होते. केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती, साक्षी महाराज, केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी एकापाठोपाठ वादग्रस्त विधाने करून भाजपला गोत्यात आणले होते. त्या पाश्र्वभूमीवर मोदी यांनी भाजप खासदारांना मर्यादेचे पालन करण्याचा सल्ला दिला.
खासदारांच्या बैठकीत बोलताना मोदी म्हणाले की, विकासकामांवर लक्ष द्या. त्यामुळेच आपली ओळख निर्माण होईल. विकासकामे जमिनीवर दिसली पाहिजेत. कोणतेही विधान करण्यापूर्वी विचार करा. वादग्रस्त विधानांमुळे पक्षाची व सरकारची छबी खराब होते, असे मोदी म्हणाले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पारदर्शी प्रशासन’ विषयावर विविध स्तरांवर परिसंवाद आयोजित करा. स्वच्छ भारत अभियानात लोकांचा सक्रिय सहभाग वाढवा, असे आवाहन मोदींनी केले. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, संसदीय कामकाज मंत्री वेंकय्या नायडू यांचीही भाषणे झालीत. धर्मातरणाच्या मुद्दय़ावरून राज्यसभेचे कामकाज ठप्प पाडणाऱ्या विरोधकांवर जेटली यांनी टीका केली. ते म्हणाले की, विरोधकांना कामकाज नको आहे. परंतु सरकार त्यांना जुमानणार नाही.
संग्रहित लेख, दिनांक 17th Dec 2014 रोजी प्रकाशित
‘मर्यादा पाळा’ ; मोदींची पक्षाच्या खासदारांना तंबी
कोणत्याही परिस्थितीत विकासाच्या मुद्दय़ापासून दूर न जाण्याची सूचना करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप खासदारांना ‘मर्यादा’ पाळण्याचा सल्ला दिला.

First published on: 17-12-2014 at 12:10 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi warns mps not to cross lakshman rekha