PM Narendra Modi Speech On GST 2.0: जीएसटी सूसुत्रीकरणानंतर उद्यापासून देशभरात जीएसटी २.० लागू होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी देशातील कर व्यवस्था, जीएसटीमधील बदल आणि भारतीयांनी स्वदेशी वस्तूंना प्राध्यन्य देण्यावर भाष्य केले.

यावेळी पंतप्रधानांनी खिशातील कंगव्याचे उदाहरण देत म्हटले की, “आज, नकळत अनेक परदेशी वस्तू आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनल्या आहेत. आपल्या खिशातील कंगवा भारतीय आहे की परदेशी हे सुद्धा आपल्याला माहित नसते. आता आपण यापासून मुक्त झाले पाहिजे. आपल्या देशातील मुला-मुलींनी कष्टाने बनवलेल्या वस्तू आपण खरेदी केल्या पाहिजेत. आपण आपल्या घराला स्वदेशीचे प्रतीक बनवले पाहिजे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “आपल्याला मेड इन इंडिया असलेले सामान विकत घ्यायचे आहे. आम्ही स्वदेशी सामान विकत घेतो, हे गर्वाने सांगा. आम्ही स्वदेशी उत्पादन विकत घेतो, हेही अभिमानाने सांगा. प्रत्येक भारतीयाने याचा गर्व बाळगला पाहिजे. जेव्हा सर्व हे पाळतील तेव्हा भारताचा वेगाने विकास होईल.”

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की,, “उद्यापासून देशात ‘जीएसटी बचत महोत्सव’ सुरू होत आहे. तुमची बचत वाढेल आणि तुम्ही तुम्हाला हव्या असलेल्या वस्तू खरेदी करू शकाल. ‘जीएसटी बचत महोत्सव’चा समाजातील सर्व घटकांना फायदा होईल. या सणाचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल. देशभरातील प्रत्येक कुटुंबात आनंद वाढेल. मी देशभरातील लाखो कुटुंबांना पुढील पिढीतील जीएसटी सुधारणा आणि ‘बचत महोत्सवा’साठी मनापासून आणि शुभेच्छा देतो.”

“जेव्हा भारताने २०१७ मध्ये जीएसटी सुधारणा सुरू केली, तेव्हा ती इतिहासातील एका वळणाची आणि एका नवीन कराची निर्मितीची सुरुवात होती. अनेक दशकांपासून, आपले लोक आणि आपल्या देशातील व्यवसाय विविध करांच्या जाळ्यात अडकले होते”, असेही त्यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असेही नमूद केले की, “नवीन जीएसटी प्रणालीमध्ये आता फक्त ५% आणि १८% कर स्लॅब असतील. याचा अर्थ बहुतेक दैनंदिन वस्तू स्वस्त होतील. अन्न, औषधे, साबण, ब्रश, टूथपेस्ट, आरोग्य व जीवन विमा आणि अशा अनेक वस्तू आणि सेवा एकतर करमुक्त असतील किंवा त्याव फक्त ५% कर आकारला जाई. पूर्वी १२% कर आकारला जाणाऱ्या ९९% वस्तूंवर आता ५% कर आकारला जाईल.”