scorecardresearch

“चित्रपटांवर अनावश्यक प्रतिक्रिया देणं टाळा”; पंतप्रधान मोदींचा भाजपा नेत्यांना सल्ला; म्हणाले, “आम्ही दिवसभर…”

भाजपाच्या राष्ट्रीय मंथनमध्ये पंतप्रधान मोदी बोलत होते.

“चित्रपटांवर अनावश्यक प्रतिक्रिया देणं टाळा”; पंतप्रधान मोदींचा भाजपा नेत्यांना सल्ला; म्हणाले, “आम्ही दिवसभर…”
पंतप्रधान नरेंद्र मोदी

अभिनेता शाहरुख खान प्रमुख भूमिकेत असलेला ‘पठाण’ चित्रपट अलीकडे खूप चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. या गाण्यात दीपिका पादुकोणने भगव्या रंगाची बिकीनी परिधान केल्याने वाद निर्माण झाला होता. तसेच, भाजपाच्या नेत्यांनी गाण्यावर आक्षेप घेतला होता. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटांबद्दल भाष्य करणाऱ्या भाजपा नेत्यांना सल्ला दिल्याचं समोर आलं आहे.

वर्षभरात होणाऱ्या ९ राज्यांच्या विधानसभा आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सखोल रणनिती ठरवण्यासाठी सोमवार आणि मंगळवारी भाजपाचे राष्ट्रीय मंथन पार पडले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तेव्हाच पंतप्रधान मोदी यांनी भाजपा कार्यकर्ते आणि नेत्यांना चित्रपटाबद्दल अनावश्यक टिप्पणी टाळा, असं म्हटलं आहे.

हेही वाचा : २०१९ पेक्षाही मोठा विजय मिळवू! अमित शहा यांचा विश्वास; जे. पी. नड्डा यांना भाजप अध्यक्षपदी मुदतवाढ

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आपण दिवसभर काम करत असतो. तर, काहीजण चित्रपटांबद्दल विधानं करत असतात. याची दिवसभर माध्यमांत चर्चा होत राहते. त्यामुळे नेत्यांनी चित्रपटाबद्दल अनावश्यक वक्तव्य करण्यापासून दूर राहिलं पाहिजे.” पण, यावेळी पंतप्रधान मोदींनी कोणत्याही नेत्याच्या अथवा चित्रपटाच्या नावाचा उल्लेख केला नाही.

भाजपाचे आमदार राम कदम यांनी ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावर आक्षेप घेतला होता. “पठाण चित्रपटाला देशभरातील साधू-संतांसह सोशल मीडियावर विरोध होत आहे. अनेक हिंदू संघटना या चित्रपटाला विरोध करताना दिसत आहेत. महाराष्ट्रातही सध्या हिंदुत्व विचारधारा असणारं सरकार आहे. त्यामुळं चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकांनी समोर येऊन त्यांची बाजू स्पष्ट करावी.”

“साधू-संतानी जे आक्षेप घेतलेत, त्यावर त्यांचं (निर्माता-दिग्दर्शक) काय म्हणणं आहे हे जनतेसमोर स्पष्ट करावं. महाराष्ट्रच्या भूमीवर हिंदुत्वचा अपमान करणारी कोणतीही ‘फिल्म’ अथवा सिरीयल चालू देणार नाही आणि ती खपवूनही घेतली जाणार नाही,” असा इशारा राम कदम यांनी दिला होता.

हेही वाचा : मोदी सरकारची धोरणे लोकाभिमुख; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

तसेच मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरेत्तम मिश्रा यांनीही राज्यात चित्रपट प्रदर्शित न होऊ देण्याची इशारा दिला होता. “‘पठाण’ हा चित्रपट दोषपूर्ण असून विषारी मानसिकतेवर आधारित आहे. ‘बेशरम रंग’ गाण्याचे बोल आणि गाण्यात घातलेले भगवे आणि हिरवे कपडे यामध्ये निर्मात्यांनी बदल करणे आवश्यक आहे. नाही तर चित्रपटाचे प्रदर्शन मध्य प्रदेशात होऊ द्यायचे की नाही याचा निर्णय आम्ही घेऊ,” असं मिश्रा यांनी सांगितलं होतं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 08:13 IST

संबंधित बातम्या