PM Modi in G20 Summit Delhi 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची राजधानी दिल्लीत आजपासून (९ सप्टेंबर) सुरू झालेल्या जी२० शिखर परिषदेत आपल्या पहिल्याच भाषणात अडीच हजार वर्षांपूर्वीचा संदर्भ दिला. तसेच भारताच्या भूमीने अडीच हजार वर्षांपूर्वीच मानवतेचं कल्याण व सुख निश्चित करण्याचा संदेश दिल्याचं नमूद केलं. या दोन दिवसीय परिषदेसाठी १९ राष्ट्रांचे प्रमुख व युरोपियन युनियनचे सदस्य दिल्लीत दाखल झाले आहेत.

नरेंद्र मोदी म्हणाले, “जी २० चा अध्यक्ष म्हणून भारत सर्व देशांचं स्वागत करतो. २१ व्या शतकातील हा काळ जगाला नवी दिशा दाखवणारा आणि नवी दिशा देणारा महत्त्वाचा काळ आहे. हा असा काळ आहे जेव्हा अनेक वर्षांच्या अडचणी आता नव्या उपाययोजनांची मागणी करत आहेत. म्हणून आपल्याला मानवकेंद्री दृष्टीने पाऊल उचलत जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील आणि पुढे जावं लागेल.”

“अडीच हजार वर्षांपूर्वी भारताच्या भूमीनं हा संदेश जगाला दिला”

“आपण जमलोय त्या ठिकाणापासून काही अंतरावर एक स्तंभ उभारण्यात आला आहे. त्यावर ‘मानवतेचं कल्याण व सुख नेहमीच सुनिश्चित केलं जायला हवं’ असं लिहिलं आहे. अडीच हजार वर्षांपूर्वी भारताच्या भूमीनं हा संदेश जगाला दिला होता. या संदेशानिशी आपण या जी २० शिखर परिषदेला सुरुवात करुया”, असं नरेंद्र मोदींनी नमूद केलं.

“वर्तमानासह भविष्यातील पिढ्यांसाठी आव्हानांवर उपाययोजना कराव्या लागतील”

मोदी पुढे म्हणाले, “जागतिक अर्थव्यवस्थेतील चढउतार असो, उत्तर आणि दक्षिणमधील विभागणी असो, पूर्व आणि पश्चिममधील दुरावा असो, अन्न, इंधन आणि खते यांचं व्यवस्थापन असो, दहशतवाद आणि सायबर सुरक्षा असो, आरोग्य, उर्जा आणि पाणी सुरक्षा असो, वर्तमानासह भविष्यातील पिढ्यांसाठी आपल्याला या आव्हानांवर उपाययोजना करण्याकडे वाटचाल करावी लागणार आहे.”

हेही वाचा : G20 Konark Wheel: जो बायडेन यांना थांबवून मोदींनी दिली ‘कोणार्क चक्र’ची माहिती; काय आहे याचं महत्त्व?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कोट्यावधी भारतीय जी२० परिषदेबरोबर जोडले गेले”

“भारताचं जी २० परिषदेचं अध्यक्षपद देशांतर्गत आणि देसाच्या बाहेर समावेशकता आणि सर्वांना सोबत घेण्याचं प्रतिक झालं आहे. देशातील ६० शहरांमध्ये २०० हून अधिक बैठका झाल्या. भारतात जी २० जनतेची परिषद झाली आहे. कोट्यावधी भारतीय या परिषदेबरोबर जोडले गेले आहेत. सर्वांना सोबत घेण्याच्या भावनेनेच भारताने अफ्रीकन संघाला जी २० चं स्थायी सदस्यत्व देण्याचा प्रस्ताव दिला आहे. मला विश्वास आहे की, या प्रस्तावावर आपल्या सर्वांचं एकमत होईल,” असंही मोदींनी नमूद केलं.