scorecardresearch

“ज्ञानापेक्षा अनुभवाची ताकद जास्त”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७२ राज्यसभा सदस्यांना निरोप देताना दिला ‘हा’ सल्ला!

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, “गुजरातीमध्ये म्हणतात आवजो.. पुन्हा या. तसं तर बायबायच म्हणत असतात, पण बोलताना…!”

pm narendra modi rajyasabha speech
मोदी भाषणात राज्यसभा सदस्यांना म्हणतात, "आवजो…!"

राज्यसभेतील तब्बल ७२ सदस्यांची टर्म संपल्यामुळे त्यांना गुरुवारी निरोप देण्यात आला. यावेळी सभागृहात उपराष्ट्रपती आणि सभापती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे खासदार आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सदस्यांसाठी निरोपाची भाषणं केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी “ज्ञानापेक्षा अनुभवाची ताकद जास्त असते”, असं म्हणताना निरोप घेणाऱ्या सदस्यांच्या कामाचं कौतुक केलं. तसेच, सभागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या अनुभवाचा उपयोग करण्यासाठी मोदींनी विशेष सल्ला देखील दिला आहे.

मोदी म्हणाले “आवजो…”

आपल्या भाषणातून मोदींनी निरोप घेणाऱ्या सदस्यांना गुजराती पद्धतीने ‘आवजो’ म्हणताच सभागृहातील इतर सदस्यांनी त्याला दाद दिली. “गुजरातीमध्ये म्हणतात आवजो.. पुन्हा या. तसं तर बायबायच म्हणत असतात, पण बोलताना आवजो म्हणतात. आम्ही देखील या क्षणी हेच म्हणू की पुन्हा या”, असं मोदी निरोप घेणाऱ्या ७२ सदस्यांना उद्देशून म्हणाले.

“उरले त्यांची जबाबदारी वाढली”

“खूप सारा अनुभव या सदस्यांसोबत आहे. कधीकधी ज्ञानापेक्षा अनुभवाची ताकद जास्त असते. अनुभवातून जे मिळालेलं असतं त्यातून समस्या सोडवण्यासाठी सोपे उपाय सापडतात. अनुभवामुळे चुका कमीत कमी होत असतात. अनुभवाचं एक महत्त्व असतं. जेव्हा असे अनुभवी साथीदार सभागृहातून जातात, तेव्हा सदनाला फार मोठी कमतरता जाणवते. देशाला जाणवते. येणाऱ्या पिढीसाठी जे निर्णय होणार असतात, त्यात काहीतरी कमतरता राहाते. अनुभवी लोक जातात, तेव्हा जे इथे आहेत, त्यांची जबाबदारी वाढते”, असं मोदी म्हणाले.

“भले आज आपण सगळे या चार भिंतींमधून (राज्यसभेतून) बाहेर पडत असू, पण हा अनुभव देशाच्या भल्यासाठी चारही दिशांना घेऊन जाऊ हा आपला संकल्प असायला हवा”, असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सल्ला!

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. महापुरुषांनी देशाला खूप काही दिलं आहे. आता देण्याची जबाबदारी आपली आहे. आता आपल्याकडे खूप जास्त वेळ असेल. सभापतींचं वेळेचं बंधन देखील नसेल”, असं मोदींनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

“तुम्ही मोठ्या व्यासपीठावर या अमृत महोत्सवाच्या माध्यमातून नव्या पिढीला मार्गदर्शन कराल अशी मला आशा आहे”, असं मोदी यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pm narendra modi in rajyasabha speech send off 72 mp members pmw

ताज्या बातम्या