भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तब्बल चार वेळा भारतीय नौदलाचा ध्वज बदलण्यात आला. मात्र, प्रत्येकवेळी त्यामध्ये ब्रिटिश राजवटीचं एक प्रकारे प्रतीक असणाऱ्या दोन लाल रंगाच्या रेषा असायच्या. या रेषांना सेंट जॉर्ज क्रॉस असं म्हटलं जातं. पण आता भारतीय नौदलाला नवा ध्वज मिळाला असून त्यावरून सर्व प्रकारच्या ब्रिटिश खुणा काढून टाकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या ध्वजावर छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची छटा असून त्याचप्रकारे अष्टकोनी पद्धतीचं नौदलाचं चिन्ह या ध्वजावर अंकित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज INS Vikrant नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर नौदलाच्या या नव्या ध्वजाचं देखील अनावरण करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपतींपासून प्रेरणा घेऊन हा ध्वज तयार करण्यात आल्याचं सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कसा आहे नौदलाचा नवा ध्वज?

नौदलाच्या नव्या ध्वजामध्ये डाव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात भारताचा तिरंगा आहे. तर उजव्या बाजूला अष्टकोनी आकारामध्ये निळ्या पार्श्वभूमीवर सोनेरी रंगात अशोकस्तंभ आणि नौकांचा नांगर काढण्यात आला आहे. या अष्टकोनी आकाराला सोनेरी रंगात दुहेरी किनार काढण्यात आली आहे. सर्वात बाहेरची किनार ही जाड आणि त्याच्याआतील किनार ही काहीशी बारीक आहे.

INS Vikrant : स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत नौदलाच्या सेवेत दाखल

छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेचा आकार आणि त्याला असलेली दुहेरी किनार यावरून प्रेरणा घेऊन ध्वजासाठी ही नक्षी तयार करण्यात आली आहे. अशोकस्तंभाच्या खाली ‘सत्यमेव जयते’ असं निळ्या रंगात लिहिण्यात आलं आहे. त्यासोबत नांगराच्या खाली ‘सम नो वरुनाह’ हे नौदलाचं ब्रीदवाक्य लिहिण्यात आलं आहे.

भारतीय नौदलाचा झेंडा बदलणार; स्वातंत्र्यानंतर चार वेळा झाले बदल, जाणून घ्या इतिहास

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात…

“आज भारतानं गुलामगिरीचं एक चिन्ह आपल्या छातीवरून उतरवून ठेवलं आहे. आजपासून भारतीय नौसेनेला एक नवा ध्वज मिळाला आहे. आत्तापर्यंत भारतीय नौसेनेच्या ब्रिटिश ध्वजावर गुलामगिरीचं चिन्ह होतं. पण आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन नौदलाचा नवा ध्वज समुद्रात आणि आकाशात फडकेल. आज मी हा नवा ध्वज नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित करतो. मला विश्वास आहे की भारतीयत्वाच्या भावनेनं भारलेला हा नवा ध्वज भारतीय नौदलाच्या आत्मसन्मान आणि आत्मसामर्थ्याला नवी ऊर्जा देईल”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

‘या’ देशांनी जॉर्ज क्रॉस बदलला…

खरं तर, बहुतेक कॉमनवेल्थ देशांनी त्यांच्या स्वातंत्र्याच्या वेळी सेट जॉर्ज क्रॉस झेंडा कायम ठेवला होता. त्यानंतर गेल्या काही वर्षांत अनेक देशांनी नौदलाच्या झेंड्यातून जॉर्ज क्रॉस काढलं. त्याऐवजी आपल्या नौदलाच्या चिन्हांवरून नवीन ध्वज स्वीकारला. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा हे प्रमुख देश आहेत. रॉयल कॅनेडियन नौदलाने २०१३ मध्ये एक नवीन झेंड्याचा स्वीकार केला. त्यांच्या झेंड्यात वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात कॅनडाचा ध्वज आणि पांढर्‍या पार्श्वभूमीवर कॅनेडियन नेव्हल क्रेस्ट आहे.

ऑस्ट्रेलियन नौदलाने १९६७ साली आपल्या नौदलाचं चिन्ह बदललं. त्यांनी नौदलाच्या झेंड्यात युनियन जॅक आणि सहा निळ्या रंगाचे तारे (स्टार) समाविष्ट केले. न्यूझीलंडच्या नौदलानेही १९६८ मध्ये जॉर्ज क्रॉस काढून टाकला. त्याऐवजी पांढऱ्या पार्श्वभूमीवर वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात युनियन जॅक आणि चार लाल तारे असलेला ध्वज स्वीकारला. दक्षिण आफ्रिकेच्या नौदलाच्या झेंड्यावर रेड जॉर्ज क्रॉसऐवजी हिरवा क्रॉस आहे. तर पाकिस्तानच्या नौदलाच्या चिन्हावर केवळ नौदल क्रेस्ट आहे. बांगलादेश नौदलाचा झेंडा पांढऱ्या रंगाचा असून त्यावर वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात बांगलादेशचा राष्ट्रध्वज आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi inaugurates new navy flag chhatrapati shivaji maharaj rajmudra pmw
First published on: 02-09-2022 at 11:59 IST