पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उत्तर प्रदेशच्या संभल भागातील कलकी धामचं भूमिपूजन पार पडलं. यावेळी काँग्रेसमधून नुकतेच निलंबित झालेले आचार्य प्रमोद कृष्णम यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रभू श्रीकृष्ण व सर्वोच्च न्यायालय यांच्याविषयी केलेलं एक विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
आचार्य प्रमोद कृष्णम हे संभलमधील कलगी धामचे मठाधिपती असणार आहेत. आचार्यांनी कलगी धामच्या भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं होतं. काँग्रेस पक्षानं प्रमोद कृष्णम यांच्यावर कारवाई केल्यानंतर हा कार्यक्रम अधिक चर्चेत आला होता. आज भूमिपूजन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
“भारतात नव्या युगाची नांदी”
“जर मंदिरांचं बाधकाम होत आहे, तर त्याचवेळी वैद्यकीय महाविद्यालयेही उभारली जात आहेत. आज आपल्या आदर्शांच्या ऐतिहासिक प्रतिमा भारतात परत आणल्या जात आहेत. पण त्याचवेळी मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूकही भारतात येत आहे. त्यामुळे कालचक्राचं वर्तुळ पूर्ण झालं असून एका नव्या युगाची नांदी भारतात होत आहे”, असं मोदी यावेळी म्हणाले.
काँग्रेसचे आचार्य प्रमोद कृष्णम भाजपाच्या वाटेवर?
दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आचार्य प्रमोद कृष्णम यांनी आपल्या भाषणात केलेल्या एका उल्लेखाचा संदर्भ दिला. मात्र, त्यावर बोलताना मोदींनी सर्वोच्च न्यायालयाबाबत केलेलं एक विधान चर्चेचा विषय ठरलं. “आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले की प्रत्येकाकडे काही ना काही द्यायला असतं. पण माझ्याकडे द्यायला काहीही नाही. मी फक्त भावना व्यक्त करू शकतो”, असं मोदी म्हणाले.
“पण प्रमोदजी, बरं झालं तुम्ही मला काहीही दिलं नाही. नाहीतर सध्या दिवस असे फिरले आहेत, की आजच्या काळात जर सुदाम्यानं कृष्णाला एखाद्या पुरचुंडीत तांदूळ दिले असते, तर व्हिडीओ काढले गेले असते. सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका केली गेली असती. त्यावर निकाल आला असता की प्रभू कृष्ण यांना भ्रष्टाचार करून काहीतरी दिलं गेलं आणि प्रभू कृष्ण भ्रष्टाचार करत होते. या काळात आपण जगत आहोत. बरं झालं की तुम्ही काहीही न देता फक्त भावना प्रकट केल्या”, असं मोदींनी म्हणताच व्यासपीठावरील मान्यवरांनीही हसून त्याला दाद दिली.
