PM Modi interacts with Shubhanshu Shukla: आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाऊल ठेवणारे भारताचे पहिले अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी सोमवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी त्यांचे गळाभेट घेऊन स्वागत केले. या बैठीकत शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना ॲक्सिओम-४ मिशनसाठी नेलेला तिरंगा भेट दिला आणि अंतराळातून पृथ्वीचे काढलेले फोटो दाखवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर पोस्ट शेअर करत या बैठकीची माहिती दिली. ते म्हणाले, शुभांशू शुक्ला यांच्याशी चांगला संवाद झाला. शुंभाशू शुक्ला यांचा अंतराळातील अनुभव, अंतराळ क्षेत्रातील विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच गगनयान मोहिमेबाबत भारताच्या आकांक्षा अशा विविध विषयांवर आम्ही चर्चा केली. भारताला शुभांशू शुक्ला यांचा अभिमान वाटतो.
तत्पूर्वी शुक्ला दिल्ली विमानतळावर उतरले असताना त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय (IGI) विमानतळावर आगमन झाल्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह आणि भारतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (ISRO) अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचे स्वागत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारताच्या गगनयान मोहिमेसाठी शुक्ला यांचा अंतराळ अनुभव नक्कीच मौल्यवान ठरेल. शुभांशू शुक्ला यांच्याशी संवाद साधत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताला अंतराळ मोहिमेसाठी ४० ते ५० अंतराळवीरांच्या गटाची आवश्यकता आहे.
१५ जुलै रोजी शुक्ला यांनी १८ दिवसांची ॲक्सिओम-४ मोहीम पूर्ण केली. त्यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात तीन क्रू सदस्यांसह ६० हून अधिक प्रयोग केले.
मोदींशी संवाद साधताना शुक्ला म्हणाले की, विंग कमांडर राकेश शर्मा हे अंतराळात गेल्याचे लहानपणी पाहिले होते. पण मी त्यावेळी अंतराळवीर होण्याचे स्वप्न पाहिले नव्हते, कारण तेव्हा देशात अंतराळ मोहिमेचा कार्यक्रम नव्हता. पण आता अंतराळ प्रवास केल्यामुळे ते त्यांच्या मुलांना प्रेरणा देत आहेत. भारतातील मुलांना आता अंतराळवीर होण्याचे स्वप्न पाहण्याची गरज नाही, तर आता त्यांना अंतराळवीर होणे शक्य आहे.
अन्न ही अंतराळातील मोठी अडचण
अंतराळ स्थानकात शुक्ला यांनी रोप लावल्याबाबतही मोदींनी विचारणा केली. त्यावर शुक्ला म्हणाले की, अंतराळ मोहिमेत अन्न ही एक मोठी अडचण आहे. ठेवण्याची जागा आणि वजन बाळगण्याचे आव्हान याचा खर्च प्रचंड आहे. अंतराळात एका छोट्या ताटात पाण्यात पिक घेणे शक्य आहे. आठ दिवसांत रोपला अंकुर फुटल्याचे पाहिले. हा प्रयोग अंतराळ मोहिमेतील अनेक समस्यांची सोडवणूक करणारा ठरेलच, त्याशिवाय पृथ्वीलाही याची मदत होईल.