नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन कार्यक्रमात देशभरातील २९ बालकांना ‘राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकारच्या सर्व धोरणांच्या केंद्रस्थानी युवा वर्ग असून बालकांनी ‘व्होकल फॉर लोकल’ मोहिमेचा अवलंब केला पाहिजे, असे पंतप्रधानांनी या वेळी या बालकांशी संवाद साधताना सांगितले.

‘ब्लॉक चेन’ तंत्रज्ञानाचा वापर करून पंतप्रधानांनी सर्व पुरस्कारप्राप्त बालकांना डिजिटल प्रमाणपत्रांचे वाटप केले. पुरस्कारप्राप्त २९ बालकांमध्ये १४ बालिकांचा समावेश होता. नवसंशोधन, शैक्षणिक यश, क्रीडा, कला व संस्कृती, समाजसेवा आणि शौर्य या विभागांत हे पुरस्कार देण्यात आले. केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालयामार्फत दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी २०२०-२१ व २०२१-२२ या दोन वर्षांसाठी हा पुरस्कार देण्यात आला.

piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
arjun meghwal
साहित्य अकादमीच्या स्वायत्ततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह; केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीवर आक्षेप, सी. राधाकृष्णन यांचा सदस्यपदाचा राजीनामा
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

पंतप्रधानांनी या वेळी या बालकांशी ऑनलाइन संवाद साधत त्यांचे कौतुक केले. ‘जगातील बहुतेक मोठय़ा कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) भारतीय तरुण असून ही भारतासाठी खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे. जगभरात भारतीय तरुण जी भरारी घेत आहे ते गौरवास्पद असून विविध क्षेत्रांत बालके प्रगती करतात त्याचे कौतुक वाटते,’ असे पंतप्रधानांनी या वेळी सांगितले. ३ जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल चार कोटी बालकांनी करोना प्रतिबंधक लस घेतली असून संपूर्ण समाजाला यातून प्रेरणा मिळत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

महाराष्ट्रातील तीन बालकांचा ‘राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. जळगाव येथील शिवांगी काळे (शौर्य), पुण्यातील जुई केसकर (नवसंशोधन), नाशिकचा स्वयंम पाटील (क्रीडा) यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. गेल्या वर्षी करोनामुळे हे पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते. त्यामुळे यंदा गेल्या वर्षी पुरस्कार जाहीर झालेल्यांनाही गौरवण्यात आले.

नाशिकच्या स्वयम पाटील याचा गौरव

नाशिक : येथील अपंग विद्यार्थी स्वयंम पाटील यास पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आले. स्वयंम हा राणेनगर येथील शारदाशेठ जाजू विद्यामंदिर शाळेत आठवी इयत्तेत शिकत आहे. तो डाऊनसिंड्रोम आजाराने त्रस्त होता. आजारावर मात करत सध्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत शिकत आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबई येथे खाडीत १४ किलोमीटरचे अंतर कापण्याची कामगिरी स्वयंमने केली. त्याची दखल घेत केंद्र शासनाच्या वतीने स्वयंमची क्रीडा गटासाठी २०२२ वर्षांकरिता पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड झाली.

नागपूरच्या श्रीनभ अग्रवालला पुरस्कार

नागपूर : किशोरवयात संशोधन क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी करणाऱ्या नागपूरच्या श्रीनभ मौजेश अग्रवाल याला सोमवारी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  हा पुरस्कार श्रीनभला हा पुरस्कार ऑनलाईन कार्यक्रमात जिल्हाधिकारी विमला आर. यांच्या हस्ते नागपुरात प्रदान करण्यात आला. श्रीनभला सन २०२०-२१ साठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.  त्याने स्वत: दोन पुस्तके लिहिली असून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पत्रिकांमध्ये त्याचे अनेक लेख छापून आले आहेत. याशिवाय ‘ट्रिपल लॉक बोर होल प्रोटेक्शन लीड’वर त्याचे पेटंटदेखील प्रकाशित झाले आहे. ‘आयआयटी कानपूरचे’ भौतिकशास्त्राशी संबंधित दोन अभ्यासक्रमदेखील त्याने पूर्ण केले आहेत. सध्या तो इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स बंगळुरू येथे प्रथम वर्षांत (बीएस/रिसर्च) शिक्षण घेत आहे.

आईचे प्राण वाचविले, शिवांगीचा सन्मान

जळगाव : पाणी तापविणाऱ्या यंत्राचा (वीज हिटर) आईला जोरदार धक्का बसल्याने ती न्हाणीघरात कोसळली. मदतीसाठी जोरात ओरडू लागली. घरात पाच वर्षांची शिवांगी आणि तिची दोन वर्षांची बहीण या दोन लहानग्या होत्या. आईची अवस्था पाहून त्या घाबरून रडू लागल्या. यावेळी प्रसंगावधान राखत शिवांगीने आईला स्पर्श न करता यंत्राचे बटण बंद करून आई, लहान बहिणीसह स्वत:चे प्राण वाचविले. वर्षभरापूर्वी म्हणजे पाच जानेवारी २०२१ रोजीची ही घटना. या धाडसी कामगिरीबद्दल येथील सहा वर्षांच्या शिवांगी काळेला शौर्य श्रेणीत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.