काही विशिष्ट गटाच्या लोकांकडून न्यायसंस्थेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे पत्र देशातील ६०० वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांना लिहिले. हे पत्र लिहिल्यानंतर काही तासांतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भाष्य केलं आहे. या पत्राच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. इतरांना घाबरवणं-धमकावणं ही काँग्रेसची जुनी सवय आहे, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉ बिट या एक्स हँडलवरील एक पोस्ट शेअर केली आहे आणि त्यावर आपलं मत नोंदवलं. ते म्हणाले, “काँग्रेसने घाबरवण्याची आणि धमकावण्याची संस्कृती जोपासली. पाच दशकापूर्वी ते न्यायपालिकेच्या कटिबद्धतेबद्दल बोलत होते. त्यांना निलाजरेपणाने स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांची कटिबद्धता हवी असते. राष्ट्राप्रती मात्र त्यांना काहीच देणंघेणं नसतं. १४० कोटी भारतीयांनी त्यांना नाकारलं तर आश्चर्य वाटणार नाही.”

काही विशिष्ट लोकांचा समूह न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा, न्यायालयीन प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा आणि विचित्र तर्क आणि राजकीय अजेंड्याच्या आधारावर न्यायालयांची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप करून देशातील ६०० वकिलांनी सर्वोच्च न्यायालायचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्यासमोर पत्राद्वारे चिंता व्यक्त केली आहे. ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे आणि इतर ६०० वकिलांनी असा आरोप केल्यामुळे देशभरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष करून लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मागच्या काही काळात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिले आहेत. यातील अनेक निकाल हे राजकारणाशी निगडित होते.

वकिलांनी या पत्रात म्हटले की, राजकीय नेते आणि भ्रष्टाचाराची प्रकरणांमध्ये गुंतलेल्या लोकांकडून न्यायालयावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. “हेतुपुरस्सर न्यायव्यवस्थेवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न एका गटाकडून केला जात आहे. त्यामुळे न्यायाव्यवस्थेच्या कार्याचे वैशिष्ट असलेले विश्वास आणि सौहार्दाचे वातावरण बिघडत आहे. राजकीय आणि भ्रष्टाचाराच्या प्रकणांमध्ये गुंतलेल्या लोकांकडून न्यायव्यवस्थेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे न्यायालयाला धमकावले जात आहे. तसेच लोकशाही व्यवस्थेला धोका निर्माण होत आहे”, अशी चिंता या पत्रातून व्यक्त करण्यात आली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi reaction after lawyers write to cji on vested interest group kvg
First published on: 28-03-2024 at 18:16 IST