मणिपूरप्रश्नी विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१० ऑगस्ट) उत्तर दिलं. उत्तराच्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. भारताच्या जनतेत काँग्रेसबाबत अविश्वास आहे, कारण हे आत्तापर्यंत झोपाच काढत होते, असं पंतप्रधान म्हणाले. तसेच यावेळी मोदी यांनी देशभरातील वेगवेगळ्या राज्यातून काँग्रेसची सत्ता का गेली, कधीपासून तिथे काँग्रेस सत्तेत आलेलं नाही, याची यादी वाचून दाखवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, मतदारांना भुलवण्यासाठी या काँग्रेसने गांधी हे नाव चोरलं. काँग्रेसची आतापर्यंतची निवडणूक चिन्हं चोरलेली आहेत. दोन बैल, गाय-बछडा आणि नंतर घेतलेलं हाताचा पंजा ही सगळीच चिन्हं त्यांची वृत्ती दर्शवतात. पक्ष आणि सत्ता सगळं काही एका परिवाराच्या हातात केंद्रीत असल्याचं त्यांच्या चिन्हातून स्पष्ट होतंय.
नरेंद्र मोदी म्हणाले, आता यांनी त्यांच्या आघाडीचं नाव बदललं आहे. आघाडीला इंडिया आघाडी असं नाव त्यांनी दिलंय. परंतु, ही इंडिया आघाडी नसून घमंडिया आघाडी आहे. तिकडे आता प्रत्येकजण नवरदेव बनू इच्छितो. सगळ्यांनाच पंतप्रधान बनायचं आहे. त्यांनी हा साधा विचार केला नाही की कोणत्या राज्यात कुणाबरोबर तुम्ही कुठे पोहोचला आहात? कुठल्या राज्यात कोणाबरोबर आणि कोणाविरोधात बसला आहात. पश्चिम बंगालमध्ये तुम्ही तृणमूलबरोबर आणि कम्युनिस्ट पक्षाच्या विरोधात आहात. तर दिल्लीत एकत्र आहात.
हे ही वाचा >> “दाढी आणि कपडे पाहून त्याने…”, असदुद्दीन ओवैसींनी लोकसभेत मांडला जयपूर-मुंबई ट्रेनमधील हत्याकांडाचा मुद्दा
नरेंद्र मोदी म्हणाले, रावणाची लंका हनुमानानं नव्हे तर त्यांच्या (रावण आणि त्याची सेना) गर्वानं जाळली. हे सत्य आहे. जनता भगवान रामाच्या रुपात आहे. त्यामुळेच हे (काँग्रेस) ४०० वरून ४० झाले (खासदारांची संख्या ४०० वरून ४० पर्यंत कमी झाली) आहेत.