माले : ‘मालदीवसारखा विश्वासार्ह देश मित्र असल्याचा अभिमान आहे,’ असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी काढले. तसेच, मालदीवसाठी ४८५० कोटी रुपयांच्या ‘लाइन ऑफ क्रेडिट’ची घोषणा केली.

मालदीवचे अध्यक्ष महंमद मुईझ्झू यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केल्यानंतर मोदींनी ही घोषणा केली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेपूर्वी उभय नेत्यांमध्येच फक्त चर्चा झाली. व्यापार, संरक्षण आणि पायाभूत क्षेत्रात अधिक सहकार्यावर या वेळी लक्ष देण्यात आले.

पंतप्रधान मोदी यांच्या मालदीव भेटीने दोन्ही देशांतील गेल्या काळात ताणलेले संबंध दूर होण्यामध्ये मदत होणार आहे. दोन्ही देश द्विस्तरावरील गुंतवणूक करारासाठी काम करतील, अशी अपेक्षाही मोदी यांनी व्यक्त केली. मुक्त व्यापार करारासाठी चर्चा सुरू झाल्याचेही ते म्हणाले.दरम्यान, मोदी यांचे माले येथे शुक्रवारी सकाळी आगमन झाले.

मालदीवचे अध्यक्ष मुईझ्झू आणि इतर वरिष्ठ नेते मोदींच्या आगमनावेळी उपस्थित होते. मोदी यांना ऐतिहासिक रिपब्लिक स्क्वेअर येथे समारंभपूर्वक मानवंदना देण्यात आली. ‘मुईझ्झू स्वत: माझ्या स्वागतासाठी विमानतळावर आले. त्यांच्या अशा येण्याने मी कृतज्ञ आहे.

येत्या काळात भारत-मालदीव मैत्री नवी उंची गाठेल, याची मला खात्री आहे,’ असे मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी २६ जुलै रोजी प्रमुख अतिथी म्हणून मालदीवच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहतील. भारताच्या सहाय्याने करण्यात येत असलेल्या विकासकामांचे उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताच्या ‘नेबरहूड फर्स्ट’ आणि ‘महासागर’ (म्युच्युअल अँड होलिस्टिक अॅडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अॅक्रॉस रीजन्स) धोरणात मालदीवचे स्थान महत्त्वाचे आहे. भारताने मालदीवला ५६.५ कोटी डॉलर (४८५० कोटी रुपये) ‘लाइन ऑफ क्रेडिट’ देण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण आणि सुरक्षेमध्ये परस्परसहकार्य हा आपल्यातील विश्वास दाखवतो. मालदीवची संरक्षण क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी भारताचा नेहमीच पाठिंबा राहील. नरेंद्र मोदीपंतप्रधान