भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या संसदेला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दहशतवाद, रशिया युक्रेन युद्ध यासह विविध मु्द्द्यांवर भाष्य केलं. त्याचप्रमाणे त्यांनी AI या शब्दाचा नवा अर्थ सांगितला. AI चा अर्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा होतो. मात्र त्यांनी आपल्या भाषणात वेगळा अर्थ सांगितला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?

२०० वर्षांपासून भारताने विश्वास संपादन करुन तो वृद्धींगत केला आहे. भारत आणि अमेरिकेच्या संबंधांवर महात्मा गांधी आणि मार्टिन लूथर किंग यांचा प्रभाव आहे. दोन शतकं दोन्ही देश एकमेकांवर प्रभाव पाडत आले आहेत. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांसाठी लोकशाहीची मूल्यं जपणं हे प्रथम कर्तव्य आहे. भारतात २ हजार ५०० राजकीय पक्ष आणि १ हजारांहून अधिक भाषा बोलल्या जातात. दर १०० मैलांवर खाद्यसंस्कृतीही बदलते. जगाच्या लोकशाहीचा सहावा भाग भारत आहे. भारताचा विकास हा इतर देशांवर सकारात्मक परिणाम करणारा ठरतो. कारण भारत जेव्हा प्रगती करतो तेव्हा इतर देशही प्रगती करतात. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ असा नाराही यावेळी मोदींनी भाषणात दिला.

AI चा नवा अर्थ उलगडला

आजचा काळ हा AI म्हणजेच आर्टिफिशयल इंटेलिजन्सचा आहे. मात्र आज मी तुम्हाला AI चा नवा अर्थ सांगतो. AI म्हणजे अमेरिका-इंडिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वाक्य उच्चारताच टाळ्यांचा कडकडाट झाला. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री १.३० च्या सुमारास त्यांनी हे भाषण केलं.

अमेरिकेच्या संसदेत दुसऱ्यांदा भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषण करण्यासाठी भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १.३० वाजता अमेरिकेच्या संसदेत पोहचले. अमेरिकेच्या संसदेत भाषण करण्याची ही त्यांची दुसरी वेळ होती. ज्यावेळी मोदी संसदेत आले तेव्हा मोदी-मोदीचा गजरही झाला. याआधी २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेत भाषण दिलं होतं.