करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १०० कोटी लसींच्या डोसचा टप्पा पार करून भारताने गुरुवारी नवा विक्रम नोंदवला. देशाच्या करोनाविरोधी लढ्यातील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत. यासंदर्भातील माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन देण्यात आलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सकाळी सात वाजता करण्यात आलेल्या ट्विटमध्ये, “पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दहा वाजता देशाला संबोधित करतील,” असं म्हटलं आहे. मोदी नक्की कोणत्या विषयावर बोलणार हे स्पष्ट करण्यात आलेलं नसलं तरी कालच देशामध्ये १०० कोटी लसींचा टप्पा पूर्ण झाल्याने मोदी या लसीकरण मोहिमेसंदर्भातच भारतीयांना माहिती देतील आणि लसीकरण मोहीम या पुढे कशी राबवली जाईल याबद्दल भाष्य करतील असं म्हटलं जात आहे.

देशात यंदा १६ जानेवारीपासून करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्यानंतर पहिल्या दहा कोटी डोस देण्यासाठी ८५ दिवस म्हणजे जवळपास तीन महिने लागले होते. २१ जूननंतर या मोहिमेला गती मिळाली.

लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून जवळपास नऊ महिन्यांच्या कालावधीत गाठलेला हा यशाचा टप्पा मैलाचा दगड ठरला आहे, असे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वैज्ञानिकांसह संपूर्ण देशवासीयांचे अभिनंदन केले. या यशानिमित्त मोदी यांनी गुरुवारी राम मनोहर लोहिया रुग्णालयातील लसीकरण केंद्राला भेट देऊन कर्मचारी तसेच काही लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया उपस्थित होते. या कार्यसिद्धीबद्दल मंडाविया यांनी एका ट्वीटद्वारे देशाचे अभिनंदन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुशल नेतृत्वाचा हा परिपाक आहे, असेही मंडाविया म्हणाले.

लसीकरण मोहिमेच्या या यशाबद्दल लाल किल्ला येथे एक कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. तिथे एका कार्यक्रमात गौरवगीत आणि चित्रफित प्रकाशित करण्यात आली.

 देशभरात १०० कोटी मात्रांचे लसीकरण पूर्ण झाल्याचे स्वागत करणारी, तसेच करोनायोद्धे व आरोग्य कर्मचारी यांनी या संकटाच्या काळात केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांचे अभिनंदन करणारी घोषणा देशभरातील रेल्वे स्थानकांवर करण्यात आली. केंद्र सरकारच्या काही रुग्णालयांवर बॅनर्स लावण्यात आले. काही रुग्णालयांत कर्मचारी व लसीकरणासाठी आलेल्या लाभार्थ्यांना मिठाई वाटप करण्यात आले.

अंदमान व निकोबार बेटे, चंडीगड, गोवा, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर, लक्षद्वीप, सिक्कीम, उत्तराखंड आणि दादरा व नगर हवेली ही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील संपूर्ण प्रौढ लोकसंख्येला लशीची किमान एक मात्रा मिळाली आहे. उत्तर प्रदेशात आतापर्यंत सर्वात जास्त लसमात्रा देण्यात आल्या असून, त्याखालोखाल महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, गुजरात व मध्य प्रदेश ही राज्ये आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi to address the nation at 10 am today scsg
First published on: 22-10-2021 at 07:30 IST