भारताच्या जनतेने आपल्याला भरभरून दिले आहे. केंद्र सरकारसह अनेक राज्यांमध्ये भाजपचे सरकार असल्यामुळे आता आपली जबाबदारी वाढली आहे. सत्तेचा उपयोग सुखासाठी नाही तर जनसेवेसाठी करायचा आहे असा मंत्रच सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत दिला, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या संदर्भातील ट्विट ‘एएनआय’ या वृत्तवाहिनीने ट्विट केले आहेत.

आपल्यावर मोठी जबाबदारी आहे. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, लोकांना भेटावे, गरीबांचे कल्याण करणे हे आपल्या सरकारचे लक्ष्य आहे. ‘मुद्रा योजना’ असो, ‘जनधन योजना’ असो किंवा ‘उज्ज्वला योजना’ ज्या योजनांमुळे गरीबांचे कल्याण होते, त्या सगळ्या मला समाधान देतात असेही पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात म्हटल्याचे जेटली यांनी सांगितले.

आज झालेल्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेले भाषण २०१९ च्या निवडणुकांची नांदीच आहे अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले, तर विरोधकांवर कडाडून टीका केली. विरोधी पक्षासाठी सत्ता हे उपभोगाचे साधन आहे, म्हणूनच त्यांना पायउतार व्हावे लागले आहे. काळ्या पैशांविरोधातील लढाई हा अजेंडा आधीच्या सरकारचा नव्हता म्हणून आपण घेतलेल्या कठोर निर्णयांचा त्यांना त्रास होणारच असेही मोदींनी म्हटले आहे.

भाजपकडून जनतेला अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनीच कंबर कसून प्रयत्न केले पाहिजेत. अनेकदा विरोधक त्यांची पातळी सोडून आपल्यावर टीका करतात. वाटेल त्या शब्दांची विशेषणे लावून आपल्याला दूषणे दिली जातात. त्याकडे दुर्लक्ष करा असाही सल्ला पंतप्रधानांनी दिला असल्याचे अरूण जेटलींनी पत्रकारांना सांगितले.