भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा सामथ्र्यवान नेते असा प्रचार त्यांच्या पक्षाकडून केला जात आहे. मात्र तुमचे नेतृत्व काय करणार आहे, कोणती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या नेतृत्वाचा उपयोग करणार आहात, याबाबत कोणतीही ठोस माहिती भाजपकडून दिली जात नाही, अशी टीका करत भाजपकडून केला जाणारा हा प्रचार अयोग्य असल्याचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सांगितले.
काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत पंतप्रधान बोलत होते. ‘‘नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून लोकसभा निवडणुकीच्या निकालाविषयी भाष्य करू नये. विधानसभा निवडणुकांचा लोकसभा निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही. २००३मध्ये झालेल्या काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने घवघवीत यश मिळवले होते. मात्र त्यानंतर २००४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाला सपाटून मार खावा लागला आणि काँग्रेस सत्तेवर आली होती,’’ अशी माहिती डॉ. सिंग यांनी दिली. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर निराश न होता काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले पाहिजे, असा सल्ला  दिला.
सोनिया गांधी यांची भाजपवर टीका
विरोधकांची विचारसरणी संकुचित असून, त्यामुळे देशाच्या आणि देशवासीयांच्या विकासाला आणि आधुनिकीकरणाला बाधा पोहोचू शकते,’’ अशी टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजपचे नाव न घेता केली.