घरात एका पुरुषाच्या मृतदेहाचे तुकडे पसरलेले असताना एक महिला तिथे गाढ झोपेत असल्याचं आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार पाकिस्तानच्या कराची शहरामध्ये घडला आहे. या प्रकारामुळे पलीस देखील काही क्षण चक्रावले होते. विशेषत: ज्या शांतपणे ही महिला चौकशीदरम्यान पोलिसांच्या प्रश्नांना उत्तरं देत होती, ते पाहून पोलीस बुचकळ्यात पडले. हा प्रकार नेमका काय आहे आणि हत्या नेमकी कोणी केली, हे अद्याप समोर आलेलं नसलं, तरी मुख्य आरोपी म्हणून संबंधित महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.
नेमकं घडलं काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना कराचीच्या सद्दार भागामधून फोन कॉल आला. या परिसरातील एका इमारतीत फ्लॅटच्या बाहेर मानवी देहाचे अवयव पडले असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना घराबाहेर पडलेले मृतदेहाचे तुकडे दिसून आले. पोलिसांनी घराचा दरवाजा उघडला, तेव्हा आतलं दृष्य पाहून पोलिसांना धक्का बसला. कारण फ्लॅटमध्ये एका पुरुषाच्या मृतदेहाचे तुकडे पसरले होते. आणि या तुकड्यांसोबत एक महिला गाढ झोपेत होती.
पोलिसांनी सदर महिलेला मुख्य आरोपी म्हणून अटक केली आहे. महिलेच्या कपड्यांवर लागलेले रक्ताचे डाग आणि घरात मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारं यावरून या महिलेला अटक करण्यात आली आहे. घरातून पोलिसांनी एक चाकू, एक हातोडा आणि हत्येसाठी वापरली गेल्याची शक्यता असलेली एक अवजड वस्तू ताब्यात घेतली आहे.
ओमायक्रॉनची दहशत! पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून डॉक्टर फरार, चिट्ठीतून धक्कादायक खुलासे
मृत व्यक्ती महिलेचा पती की दीर?
महिलेची चौकशी केल्यानंतर आधी तिने मृत व्यक्ती तिचा ७० वर्षीय पती मोहम्मद सोहेल असल्याचं सांगितलं. मात्र, काही वेळानंतर लग्न झाल्याचंच तिनं नाकारलं. नंतर तो तिचा दीर असल्याचं ती म्हणाली. आसपासच्या लोकांनी हे दोघे लिव्ह-इनमध्ये राहात असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांच्यामध्ये पैशांवरून वाद होत होते, असं देखील सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत असून सखोल चौकशीनंतरच चार्जशीट फाईल करण्यात येणार आहे.