नवी दिल्ली : मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त भागांत रहिवाशांची विचापूस करण्यासाठी गेलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींचा ताफा गुरुवारी पोलिसांनी अडवला. तेथे रंगलेल्या मोठय़ा नाटय़ानंतर ते हेलिकॉप्टरने चुराचंदपूर येथील निर्वासितांच्या छावणीत पोहोचले व पीडित कुटुंबांची भेट घेतली. गांधी यांची वाट अडविल्याने काँग्रेस व भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

राहुल गांधी आपल्या ताफ्यासह इम्फाळहून चुराचंदपूरकडे निघाले होते. मात्र इम्फाळपासून २० किलोमीटरवर विष्णूपूर येथे पोलिसांनी हा ताफा अडविला. त्यामुळे चिडलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. आंदोलन ऊग्र झाल्याने पोलिसांना अश्रुधाराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या. गांधी यांनीही आपल्याला अडविल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘मी मणिपूरमधील माझ्या सर्व बंधू-भगिनींचे म्हणणे ऐकण्यासाठी आलो आहे. इथे सर्व समाजाचे लोक स्वागत करत आहेत. पण, सरकार मला त्यांच्यापर्यंत पोहचू देत नाही, मणिपूरमधील शांततेलाच आमचे प्राधान्य असेल,’ असे ट्वीट त्यांनी केले. या दौऱ्याला काही जणांचा विरोध असून ताफ्यावर वाटेत हल्ला होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांना हेलिकॉप्टरने चुराचंदपूरला जाण्यास सांगण्यात आले. अखेर गांधी यांनी याला मान्यता देत पुन्हा इम्फाळ विमानतळ गाठले व तिथून हेलिकॉप्टरने चुराचंदपूरला रवाना झाले. राहुल गांधी यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेऊन रस्त्याने जाण्याची परवानगी दिली नाही, असे विष्णुपूरचे पोलीस प्रमुख हेसनम बलराम सिंग यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. राहुल गांधींचा दौरा घोषित झाल्यापासून ऑल इंडिया मणिपूर स्टुटंड युनियन वगैरे काही विद्यार्थी संघटनांनी विरोध सुरू केला होता व राहुल गांधींच्या दौऱ्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते, इथे येऊन वातावरण भडकवण्याचा प्रयत्न करू नये, असे या संघटनांचे म्हणणे होते.

चुराचंदपूर येथे हेलिकॉप्टरने गेल्यानंतर राहुल गांधी यांनी निर्वासित छावण्यांमधील नागरिकांशी चर्चा केली. मात्र त्यांना मोईरांगचा दौरा रद्द करावा लागला. तेथील स्थानिक प्रशासनाने हेलिकॉप्टरनेही येण्यास मनाई केली. त्यामुळे राहुल गांधी चुराचंदपूरहून पुन्हा इम्फाळला परतले. ते शुक्रवारीही राज्याच्या दौऱ्यावर असले तरी संवेदनशील भागांमध्ये भेटी देण्यास प्रशासनाने परवानगी दिली नसल्याने ते कोणत्या भागांत भेट देणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, राहुल गांधींना अडविल्यामुळे काँग्रेस आणि भाजपमध्ये राजकारण सुरू झाले आहे. राहुल गांधींनी आडमुठेपणा करण्यापेक्षा संवेदनशीलतेने परिस्थिती हाताळायला हवी होती. ते कधीही जबाबदारीने वागत नाही. त्यांच्या मणिपूरभेटीला कोणीही विरोध केलेला नाही. पण, तिथे हिंसा होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी हेलिकॉप्टरने जाण्याची विनंती केली होती. पण, आधी त्यांनी ऐकले नाही, असा आरोप भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी केला. तर काँग्रेसने पोलिसांच्या भूमिकेवर टीका केली. पोलिसांनीच रस्तामार्गे जाण्याची परवानगी दिली होती. मग, ऐनवेळी त्यांना का अडविले गेले, असा सवाल काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला. राहुल गांधींनी मणिपूर दौऱ्याचे समर्थन केले. पंतप्रधान मोदींनी मणिपूरला वाऱ्यावर सोडून दिले आहे. तिथल्या हिंसाचाराबाबत त्यांनी मौन बाळगले आहे. पीडितांची विचारपूस करायला जाणाऱ्या राहुल गांधींना मात्र अडवले जाते. यातून हुकुमशाही वृत्तीच दिसते, अशी टीका काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.

गोळीबारात एकाचा मृत्यू

गेले काही दिवस तणावपूर्ण शांतता असलेल्या मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. गुरूवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कांगपोकपी जिल्ह्यातील हरोथेल गावामध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. यामध्ये किमान एकाचा मृत्यू झाला असून अन्य काही जण जमिनीवर पडलेले आढळल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. अधूनमधून गोळीबार होत असल्याने मदत पोहोचविणे अशक्य झाल्याची माहिती आहे. घटनेनंतर गावातील कुमक वाढविण्यात आल्याचे लष्कराने सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.